अमरावती-दर्यापूर मार्गावर ट्रक आणि एसटीची धडक, ट्रक वाहकाचा मृत्यू
लखापूर फाट्याजवळील घटनेत सात जण गंभीर जखमी

दर्यापूर/30 जुलै; दर्यापूर ते अमरावती मार्गावरील लखापूर फाट्याजवळ मुसळधार पावसात ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकचा वाहक जागीच ठार झाला असून, ट्रक चालक, बसचालक, वाहकासह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी हा अपघात घडला. श्याम महादेव भुटे (55, रा. दामोडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ट्रक वाहकाचे नाव आहे.
दर्यापूर बसस्थानकातून हिंगणघाटकडे जात असलेल्या एसटी बसला समोरून येणार्या ट्रकने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक वाहक श्याम भुटे हे वाहनातच अडकून पडले होते. लखापूर फाट्यावर सकाळी हा अपघात घडला, त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. या दुर्घटनेमुळे अमरावती-दर्यापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक आणि पोलीस तत्काळ अपघातस्थळी पोहचले. पोलीस – आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडलेल्या जखमी वाहकाला बाहेर काढून दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात बसचालक आणि वाहक यांच्यासह बसमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे दर्यापूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. दुर्घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या प्रकरणी दर्यापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात घडल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.
अपघातांची वाढती संख्या-अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या अडीच महिन्यांत 48 प्राणांतिक अपघात घडले असून त्यात 54 जणांना प्राण गमावावे लागले आहेत. वाहनांचा अतिवेग आणि वाहतूक नियमांचे पालन न करणे, यामुळे बहुतांश अपघात घडले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर अपघातप्रवण स्थळे घोषित करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत. पण, इतरही ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने नव्याने अपघातप्रवण स्थळांची निश्चित करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.




