मेळघाटात 15 दिवसांच्या नवजात बालिकेला दिले तप्त विळ्याचे 12 चटके
अघोरी ‘डम्मा’ उपचाराची अमानवीय परंपरा अद्यापही सुरुच

चिखलदरा /30 जुलै-विज्ञान आणि वैद्यकीय उपचारांची कास जगभर घेतली जात असताना, मेळघाटातून एक अत्यंत संतापजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेट्याखेडा येथे अवघ्या 15 दिवसांच्या एका चिमुकल्या बालिकेवर उपचाराच्या नावाखाली अमानुष व अंधश्रद्धेचा कळस गाठणारा प्रकार घडला आहे. पोटाच्या त्रासावर मात करण्याच्या दाव्यापोटी 65 वर्षीय वृद्ध महिलेने त्या नवजात बालकीच्या कोवळ्या पोटावर तप्त विळ्याचे तब्बल 11 ते 12 चटके दिले आहेत. मेळघाटात या क्रूर प्रथेला ‘डम्मा’ असे म्हटले जाते.
नेमकी घटना काय?-रेट्याखेडा गावात राहणार्या एका 15 दिवसांच्या बालिकेचे पोट फुगल्यामुळे तिला शारीरिक त्रास होत होता. या त्रासावर एका बाजूला वैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच, गावातील अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर बसलेल्या भुलई जामूनकर (वय 65) या वृद्ध महिलेने बळजोरी करत अघोरी उपचार पद्धतीचा अवलंब केला.
आरोपी महिलेने चुलीवर लोखंडी विळा चांगला तापवला आणि अत्यंत निर्दयीपणे त्या 15 दिवसांच्या निष्पाप बालकीच्या पोटावर एकापाठोपाठ एक 11 ते 12 चटके दिले. या अमानुष व वेदनादायी कृत्यामुळे चिमुकलीला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या, तिची अवस्था बिकट झाली. या प्रकारानंतर घाबरलेल्या आणि संतप्त झालेल्या मुलीच्या आईने तातडीने धाव घेत चिखलदरा पोलीस ठाण्यात या क्रूरतेविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली.
‘डम्मा’ची दोन वर्षांतील तिसरी संतापजनक घटना-मेळघाटातील आदिवासी व दुर्गम भागांमध्ये लहान मुलांचे पोट फुगणे, जंत होणे किंवा पोटाशी संबंधित इतर किरकोळ आजारांवर अजूनही रुग्णालयात जाण्याऐवजी ‘डम्मा’ देण्याची (लोखंडी वस्तू तापवून चटके देण्याची) अघोरी प्रथा अंधश्रद्धेपोटी पाळली जाते.
वाढती पुनरावृत्ती: गेल्या अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत मेळघाटात उजेडात आलेली ही तिसरी घटना आहे. यामुळे आदिवासी भागांत आजही वैद्यकीय साक्षरतेचा अभाव आणि बळावलेल्या अंधश्रद्धेचे वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, प्रशासनासह समाजसुधारकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मोठी चिंता: आधुनिक युगातही केवळ अंधश्रद्धेपोटी एका 15 दिवसांच्या निष्पाप जिवावर असे पाशवी अत्याचार होत असतील, तर आरोग्य यंत्रणेसोबतच समाजप्रबोधनाची किती भीषण गरज आहे, हेच या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. यावर आता केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर गावोगावी कडक जनजागृती मोहीम राबवून अशा जीवघेण्या प्रथांना कायमची मूठमाती देणे गरजेचे आहे.




