फडणवीसांच्या मतदारसंघात 37,712 बोगस मतदारांची नोंदणी

5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढले

-काँग्रेसचा निवडणूक आयोगावर आरोप
-मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर / 24 जून: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात 5 महिन्यात 8 टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले आहे. भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी निवडणूक आयोगानेच हा गैरप्रकार घडवून आणला असल्याचा गंभीर आरोप प्रफुल्ल गुडधे यांनी केला.
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात लोकसभा निवडणुकांपासून 2024 च्या महाराष्ट्र विधान सभा निवडणुकांपर्यंत 33 हजार 712 नवीन मतदार नोंदवले गेले आहेत. काही ठिकाणी एका मोबाईलवकून 100 हून अधिक मतदारांची नोंद करण्यात आली. दुसरे म्हणजे, फॉर्म 6 ऑनलाइन तसेच ऑफलाइन सादर केला जाऊ शकतो, येथे बीएलओची महत्वाची भूमिका आहे. बीएलओने मतदाराच्या घरी वैयक्तिक भेट देऊन तपासणी करणे आवश्यक आहे. बीएलओला केवळ तपासणी अहवाल द्यावा लागणार नाही तर तपासणीची तारीख आणि वेळ देखील नमूद करावी लागते.
एका बूथमध्ये 4 टक्क्यांहून अधिक नवीन मतदार नोंदणी झाल्यास एआरओने तेथील 1 टक्के मतदारांची फेरतपासणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पाळली गेली नाही. दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 70 टक्के बूथमध्ये नवीन मतदारांची 4 टक्यांहून अधिक वाढ झाली. तसेच 38 बूथांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंद झाली. याशिवाय, 40 टक्क्यांपेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंद 8 बूथवर झाली आहे, असेही ते म्हणाले. फडणवीसांनी मतांची चोरी, भ्रष्ट मार्गाने, कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणूक जिंकली आहे. राज्य सरकारच्या संपूर्ण यंत्रणा निवडणूक जिंकण्यासाठी वापरण्यात आल्या. त्याच्यावर गृह मंत्रालयाच्या मदतीने दडपण आणण्यात आले. त्यामुळे त्यांचे नैतिक अपयश आहे आणि नैतिक अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांनी आमदारकीचा आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे, असे गुडधे म्हणाले.
-पुरावे देऊन आम्हाला खोटे ठरवावे – लोंढे
काँग्रेसच्या प्रश्नांना निवडणूक आयोग उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस उत्तरे देत आहेत. मुख्यमंत्री म्हणून राज्यातील बेरोजगारी, महागाई, शेतकर्‍यांचे आत्महत्या असे अनेक प्रश्न असताना त्यांनी आयोगाचे प्रवक्ते होऊ नये. आयोगावर खर्च करतो. त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. आम्ही उपस्थित केलेले मुद्दे पुराव्यासह खोडून आम्हाला खोटे ठरवावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले.

संबंधित बातम्या

Back to top button