जेन झी’साठी तेलंगणाचा पुढाकार

विधानसभा, लोकसभा लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव

हैदराबाद/26 जुलै- तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीचे किमान वय सध्याच्या 25 वर्षांवरून 21 वर्षे करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. या प्रस्तावासाठी ते सोमवारी दिल्लीला जाणार असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देणार आहेत.
रविवारी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना रेवंथ रेड्डी यांनी सांगितले की, देशातील ’जनरेशन झी’ ला केवळ मतदानाचा अधिकार न देता कायदे करण्याचीही संधी मिळाली पाहिजे. युवकांना संसदेचे आणि विधानसभांचे दरवाजे खुले करण्याचे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. रेवंथ रेड्डी म्हणाले, युवकांचा वाढता सहभाग आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन निवडणूक लढविण्याच्या वयोमर्यादेत बदल करणे आवश्यक आहे. मी हा प्रस्ताव इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर मांडणार आहे. त्यानंतर खासगी विधेयक संसदेत मांडण्याबाबत निर्णय होऊ शकतो. रेड्डी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की, निवडणूक लढविण्याचे किमान वय कमी करण्याच्या प्रस्तावासह लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना, लोकसभा सदस्यसंख्या वाढविणे आणि महिला आरक्षण विधेयक या चारही महत्त्वाच्या विषयांवरसंसदेत एकाच वेळी चर्चा करण्यात यावी. ही चारही प्रकरणे एकत्रितपणे संसदेत चर्चेला घ्या, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.देशात आता ‘जय जवान, जय किसान’ बरोबरच ‘जय युवा’ हा नारा दिला पाहिजे, असे सांगत रेवंथ रेड्डी यांनी युवकांना देशाच्या राजकीय प्रवाहात अधिक मोठी भूमिका देण्याची गरज व्यक्त केली. रेवंथ रेड्डी यांनी सांगितले की, शिक्षण हा समवर्ती यादीतील विषय असतानाही केंद्राने नीट परीक्षा लागू केली आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि जबाबदारी यावर लोकसभेत सखोल चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या

Back to top button