परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन
नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीकडे जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
मोदींचा महिनाभरात तिसर्यांदा तरुणाईशी रीलद्वारे संवाद
नवी दिल्ली /26 जुलै : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जुलै महिन्यात तिसर्यांदा तरुणाईशी रीलद्वारे थेट संवाद साधत पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली आहे. आधार प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार आणि प्रसिद्ध तंत्रज्ञानतज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती काम करणार आहे. देशातील परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि पूर्णपणे तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी समिती शिफारशी करणार आहे.
नीट यूजी 2026 परीक्षेचा पेपर फुटला यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. काही दिवसांनंतर नव्याने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पण उगझ अशी ओळख मिरवणार्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केले. अल्पावधीत या आंदोलनाला हिंसक वळण लागले. ठिकठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. पेपरफुटी प्रकरणावरून निर्माण झालेल्या तीव्र राजकीय आणि सामाजिकगदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला दोन पानी राजीनामा पाठवला. राजीनामा देण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी गेल्या 10 दिवसांत घडलेल्या घटनांमुळे आपल्याला अतीव वेदना झाल्याचे म्हटले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न अजिबात नाही. भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी आणि सर्वात मोठी ताकद आहे. मी देशाच्या युवाशक्तीला कोणत्याही दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हा माझा ठाम निर्धार आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात सांगितले.
भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ’विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026’ मध्ये सहभागी झालेल्या ॠशप-न तरुणांशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधानांनी भारतातील सामूहिकतेच्या परंपरेचा उल्लेख केला आणि विकसित भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात देशातील सुमारे 250 जिल्ह्यांतील युवकांनी सहभाग नोंदवला होता.कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा कार्यक्रम खरोखरच विशेष आहे. देशभरातील सुमारे 250 जिल्ह्यांतील युवक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. मी सर्वांचे अभिनंदन करतो. काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ’मेरा युवा भारत’ या प्लॅटफॉर्मशी आज देशभरातील कोट्यवधी युवक जोडले गेले असून, त्याचे स्वयंसेवक विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत.




