इन्कम टॅक्स भरणार्‍यांना दारोदारी फिरायला लावू नका

अर्थमंत्री सीतारामन यांचा अधिकार्‍यांना सल्ला

मुंंबई/26 जुलै- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, लोकांना त्यांच्या गरजांसाठी दारोदारी फिरायला लावू नका. अधिकार्‍यांना सार्वजनिक प्रश्न नियमांच्या चौकटीत राहून, वेळेत आणि संवेदनशीलपणे सोडवा. रविवारी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे 13 मजली ’इन्कम टॅक्स सिंधू’ इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलताना अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळवताना स्वतः आयकर अधिकार्‍यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जर विभागाच्या अधिकार्‍यांना अशा अडचणींचा अनुभव येऊ शकतो, तर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्याही अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत, असे सीतारामन म्हणाल्या. सरकारी विभागांच्या संथगती कामकाजाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, सरकारी जमिनीवर अवैध ताबा आणि अतिक्रमण यांसारख्या समस्यांचे हेच कारण आहे. ज्या जमिनीवर नवीन इमारतबांधण्यात आली आहे, ती जमीन 1973 पासून आयकर विभागाच्या मालकीची होती. असे असूनही, त्यावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्यात आला होता. हे प्रशासकीय निष्काळजीपणाचे उदाहरण आहे.
सीतारामन यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील आयकर अधिकार्‍यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानांच्या कमतरतेचाही उल्लेख केला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्या आवश्यक पावले उचलतील, असे त्यांनी सांगितले. भविष्यात कार्यालयीन इमारतींचे बांधकाम वेळेवर पूर्ण व्हावे, यासाठी सरकारी विभागांमधील जमीन हस्तांतरण आणि इतर मंजुर्‍यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच अर्थमंत्र्यांनी अधिकार्‍यांना बीएसएनएलच्या मालकीची उपलब्ध जमीन वापरण्याची शक्यता पडताळून पाहण्याचा सल्लाही दिला आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्याबाबतही सकारात्मकता दाखवली..

संबंधित बातम्या

Back to top button