पंढरपूर वारीसाठी वारकर्यांचे प्रस्थान
संत सचिन देव महाराजांच्या उपस्थितीत 200 भाविक रवाना

अमरावती/22 जुलै- पाऊले चालती पंढरीची वाट ही उक्ती चरितार्थ करत संत अच्युत महाराज भक्त परिवाराचे जवळपास 200 वारकरी पंढरपूर वारीसाठी रवाना झाले. जन्मभूमी संस्थान वरुड, कर्मभूमी संस्थान शेंदूरजना बाजार, अमरावती, दर्यापूर तसेच नागपूर सह विविध ठिकाणांतील श्रद्धाळूंचा हा जथा संत श्री सचिन देव महाराज यांच्या सानिध्यात आणि श्री दत्ताजी शिंदे यांच्या नेतृत्वात चार ट्रॅव्हल्स बसने पंढरपूरकडे रवाना झाला.
वारीचा पहिला मुक्काम श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे झाला. तेथे वारकर्यांनी शिवभवन, माता रुक्मिणी व भगवान पांडुरंग यांचे दर्शन घेतले. अध्यक्ष श्री विजय बांबळ यांनी अल्पोपाहाराची व्यवस्था केली. त्यानंतर संत अच्युत महाराज यांची तपोभूमी बोरगाव धर्माळे येथे वारकर्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. डॉ. आशिष धर्माळे, त्यांचे सहकारी व गावकर्यांनी स्वागत करून महाप्रसादाचे आयोजन केले. याप्रसंगी संत सचिन देव महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन झाले. प्रास्ताविक डॉ. आशिष धर्माळे यांनी केले. संत महाराजांनी वारकरी परंपरा, भक्ती व सेवेचे महत्त्व पटवून दिले. श्रद्धाळूंनी संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला भेट दिली, जिथे ट्रस्टतर्फे अल्पोपाहार देण्यात आला. इंजिनिअर सागर पासेबंद यांनी प्रास्ताविक केले. सायंकाळी वारीचा मुक्काम मनोर मांगल्य येथे झाला. तेथे पियूष महाराज यांचे भावपूर्ण कीर्तन रंगले. श्री बोदडे दांपत्याचा सत्कार डॉ. अनिल सावरकर व लेंडे गुरुजी यांच्या हस्ते झाला. दत्ताजी शिंदे यांनी आभार मानले. विश्रांतीनंतर वारकरी बुधवारी सकाळी 6 वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.




