एसटी चालकांचा पगार वाढवा, अन्यथा आंदोलन
अवैध सावकारी, शकुंतला रेल्वे व कांदा उत्पादक शेतक-यांच्या समस्येवर आ. बच्चू कडूची लक्षवेधी

अमरावती /9 जुलै – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ. बच्चू कडू यांनी एसटी कर्मचार्यांचे वेतन, अवैध सावकारी,
शकुंतला रेल्वेमार्ग आणि कांदा उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नांवरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. गोरगरीब जनता, शेतकरी आणि कष्टकर्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांना कलेक्टरच्या चालकांप्रमाणे वेतन आणि सुविधा का मिळत नाहीत, असा थेट
सवाल करत आ. कडू यांनी एसटी कर्मचार्यांच्या न्यायासाठी आवाज उठवला. दुर्गम भागात सेवा देणार्या चालकांकडे सरकारचे
दुर्लक्ष होत असून त्यांच्या सेवा अटी व सामाजिक सुरक्षेची सरकारने त्वरित समीक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.सावकारी आणि सूक्ष्म वित्त कंपन्यांच्या मनमानी कारभारावर आ. कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला. नागपूर, अकोला आणि लातूरमधील घटनांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी व्याजाच्या जाळ्यात अडकून आर्थिक शोषणाचे बळी
ठरत आहेत. कर्जदारांना मानसिक त्रास आणि सार्वजनिक अपमान सहन करावा लागत असून यावर कठोर कारवाईची गरज आहे. विदर्भाचा महत्त्वाकांक्षी शकुंतला रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून बंद असून त्याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. हा मार्ग सुरू झाल्यास शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होईल, असेही आ. कडू यांनी स्पष्ट केले. कांदा उत्पादक शेतकर्यांच्याव्यथा मांडताना त्यांनी म्हटले की, केवळ ग्राहक आणि व्यापार्यांचा विचार करणार्या सरकारने उत्पादक शेतकर्यांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. उत्पादन खर्च वाढला असून कांद्याचे भाव पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान
होत आहे. नाफेडच्या खरेदी व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी पारदर्शक खरेदीची मागणी केली. कष्टकर्यांच्या प्रश्नांवर आ.
कडू यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आता सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




