श्री हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा
परिसरातील महिलांचा उत्साही आणि सक्रिय सहभाग

अमरावती/1 एप्रिल : शहरात अनेक मंदिरं आहेत, पण काही ठिकाणं अशी असतात जिथं पाऊल ठेवलं की मनाला वेगळीच शांती मिळते. आयटीआय कॉलनीतील श्री हनुमान मंदिर हे असंच एक श्रद्धेचं ठिकाण. यावर्षी इथं हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. पन्नास वर्षांची जुनी परंपरा लाभलेल्या या देवस्थानने अमरावतीकरांना भक्तीसोबतच सामाजिक एकोप्याचा एक मोठा धडा घालून दिला आहे. आज पहाटेपासूनच ’बजरंग बली की जय’ च्या घोषणांनी आणि भजनांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा अमरावतीचा विस्तार होत होता आणि कांता नगरचा भाग हळूहळू वसत होता. आयटीआय कार्यालयातील कर्मचार्यांनी एकत्र येत आपली एक छोटी वसाहत इथं स्थापन केली. संसाराचा गाडा ओढत असताना मनाच्या शांततेसाठी आणि कार्यात यश मिळवण्यासाठी त्याकाळी इथल्या थोर-मोठ्यांनी या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली. एकेकाळी पंचवटी ते कॅम्प दरम्यानचा हा रस्ता म्हणजे केवळ एक निर्जन पायवाट होती, पण आज याच ठिकाणी श्रद्धेचा अखंड नंदादीप तेवत आहे. राजेंद्र उद्यान आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरण, झाडांची शीतल सावली आणि मंदिरातील पवित्र लहरींमुळे हा परिसर भक्तांसाठी विसावा केंद्र ठरला आहे. आजच्या या खास उत्सवासाठी कॉलनीतील तरुण पोरांनी आणि ज्येष्ठ मंडळींनी कित्येक दिवस आधीपासूनच जय्यत तयारी केली होती. मंदिराची स्वच्छता, आकर्षक विद्युत रोषणाई आणि आसमंतात डोलणारे भगवे ध्वज पाहून भाविकांचे मन प्रसन्न होत आहे. जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज शांतीविहार कॉलनी, जागृती कॉलनी आणि नवीन आयटीआय कॉलनीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. या परिसरातील माणसांचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ सणच साजरे करत नाहीत, तर एकमेकांना संकटकाळी प्रेमाने आणि आपुलकीने सहकार्य करतात. याच एकोप्यामुळे मंदिरात वर्षभर आरती, पूजा आणि कीर्तनासारखे आध्यात्मिक कार्यक्रम अखंड सुरू असतात.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ आज परिसरातील हजारो भाविक घेत आहेत. जुन्या पिढीने दिलेला संस्कारांचा आणि संस्कृतीचा हा वारसा आजची तरुण पिढी तितक्याच श्रद्धेने आणि आत्मीयतेने पुढे नेत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. शहरीकरणाच्या रेट्यात अनेकदा माणूस माणसापासून दुरावत असताना आयटीआय कॉलनीतील या उपक्रमाने गाव-खेड्यातील तो जुना जिव्हाळा पुन्हा जिवंत केला आहे.
आज पहाटेच्या मंगल समयी जेव्हा ’हनुमान जन्मोत्सव’ साजरा झाला, तेव्हा पाळणा आणि फुलांच्या वर्षावाने संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. या उत्सवातून मिळणारी ऊर्जा ही केवळ एका दिवसाची नसून, ती वर्षभर एकमेकांशी जोडले राहण्यासाठी बळ देणारी ठरते. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीचा ओलावा यामुळे या सोहळ्याने अमरावतीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. आयटीआय कॉलनीतील हे मंदिर म्हणजे केवळ वास्तू नसून संस्कारांची खाण आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिरात धार्मिक विधींसोबतच सामाजिक बांधिलकीची जपणूक केली जाते. गाव-खेड्यातील आपुलकी जपणारी ही माणसे आजच्या धावपळीच्या युगात शहरासाठी एक उत्तम आदर्श ठरली आहेत.




