जिल्ह्यात अवैध बियाणे विक्रीचा सुळसुळाट

शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग अलर्ट

* बोगस बियाणे पेरणीमुळे होणार आर्थिक नुकसान

अमरावती /4 जुन– जिल्ह्यातील कापूस उत्पादक पट्ट्यात सध्या बंदी असलेल्या एचटीबीटी (तणनाशक सहनशील) कापूस बियाण्यांची चोरट्या मार्गाने विक्री केली जात आहे. या अवैध बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, हे लक्षात घेता कृषी विभागाने तातडीने कंबर कसली असून शेतकर्‍यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शासनस्तरावर या बियाण्यांच्या विक्रीला अधिकृत परवानगी नसल्याने त्यांची खरेदी-विक्री पूर्णपणे बेकायदेशीर आहे. असे असतानाही ग्रामीण भागात काही समाजकंटकांकडून या बियाण्यांची चढ्या दराने विक्री सुरू आहे. या बोगस बियाण्यांच्या मागे गुजरातचे एखादे मोठे रॅकेट असावे, असा संशय कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी शेतकर्‍यांना आवाहन केले आहे की, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता अधिकृत कृषी केंद्रांतूनच बियाणे खरेदी करावे आणि त्याची पक्की पावती आवर्जून मागावी.
ज्या बियाण्यांवर तणनाशकांचा परिणाम होत नाही, असा दावा करत एचटीबीटी बियाण्यांची विक्री केली जात आहे. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाने या वाणाला व्यावसायिक लागवडीसाठी अद्याप कोणतीही अधिकृत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हे बियाणे पूर्णपणे धोकादायक आहे. मे महिन्यात कृषी विभागाने विशेष मोहीम राबवून या बियाण्यांविरुद्ध तीन कारवाया केल्या आहेत. या बियाण्यांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करण्यावर शासनाने पूर्णतः निर्बंध लादले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अवैध मार्गाने विकल्या जाणार्‍या या बियाण्यांच्या गुणवत्तेची कोणतीही खात्री नसते. जर बियाणे उगवले नाही किंवा पीक हाती आले नाही, तर शेतकर्‍यांकडे तक्रार करण्यासाठी किंवा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार उरत नाही. परिणामी, ऐन हंगामात शेतकर्‍यांवर उध्वस्त होण्याची वेळ येऊ शकते. कृषी विभाग या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून असून, शेतकर्‍यांनी केवळ प्रमाणित आणि अनुमती असलेल्या बियाण्यांचाच वापर करावा, जेणेकरून पीक आणि गुंतवणूक दोन्ही सुरक्षित राहतील. या अवैध बियाण्यांच्या विक्रीबाबत कोठेही माहिती मिळाल्यास तातडीने कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button