निंभा येथील भोंदू बाबाला अमरावतीमधून अटक
पाखंडी बाबाची दैवी शक्तीच्या नावावर फसवणूक

पाखंडी चेतन मुळेची रवानगी पोलीस कोठडीत
अमरावती/27एप्रिल- विदर्भातील अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमेला मोठे यश मिळाले असून अशोक खरात प्रकरणानंतर आता मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा येथील एका भोंदू बाबाला अमरावतीमधून अटक करण्यात आली आहे. स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून लोकांची फसवणूक करणार्या आणि चिमुकल्यांचा छळ करणार्या या पाखंडी बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी चेतन सुनील मुळे याने दरबार भरवून लहान मुलांना तोंडाने उचलून फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर आरोपीचा एक संतापजनक चलचित्र (व्हिडिओ) मोठ्या प्रमाणात पसरला होता. या चित्रफितीत तो आरोपी अमानुषपणे लहान मुलांच्या कपड्यांना स्वतःच्या तोंडाने पकडून त्यांना हवेत फिरवताना दिसत होता. हा प्रकार अघोरी आणि मानवी संस्कृतीला काळिमा फासणारा असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेची दखल घेऊन बाल कल्याण समिती अकोला येथील सदस्य प्रांजली मनोज जैस्वाल यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125 आणि बालन्याय अधिनियम 2015 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी चेतन मुळे फरार झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अमरावती शहरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला अमरावतीतून जेरबंद केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या सूचनेनुसार पार पडली. यामध्ये ठाणेदार श्रीधर गुड्डे, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे, पोलीस शिपाई रितेश मददी आणि शंकर खेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




