श्याम मानव सल्ला देणारे कोण?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुनावले

मुंबई/26 एप्रिल- बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूर येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.
विरोधक, इतिहासकार धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या विधानावरून टीका करत आहेत. अशातच माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबाबत सुरू असलेल्या वादात नव्याने भर पडल्याचे सांगितले जात आहे. भूषण गवई आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भेटीवरून श्याम मानव यांनी केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. सरन्यायाधीशासारखे सर्वोच्च पद भूषवूनही भूषण गवई हे धीरेंद्र शास्त्री यांच्यापुढे नतमस्तक होत असतील, तर आता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगू नये. भूषण गवई सांगतात की ते आंबेडकरी विचारांचे आहेत. पण जर ते धीरेंद्र शास्त्री यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील, तर त्यांनी आंबेडकरांचे नाव कधीही घेऊ नये. तो अधिकार त्यांनी गमावला आहे, अशी टीका श्याम मानव यांनी केली होती. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यातआला.भूषण गवईंनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊ नये, असं श्याम मानव म्हणाले होते, याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, हे असे सांगणारे श्याम मानव कोण आहेत, त्यांना कोणी अधिकार दिला, ते आता सर्टिफिकेट वाटणार का, श्याम मानव अलीकडच्या काळात फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांना कुणी विचारत नाही. त्यांना प्रसिद्धी हवी आहे, म्हणून ते रोज अशी विधाने करतात, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले.




