माझे पंख छाटणारा कोणी जन्माला आला नाही
ठाकरेंच्या ‘ऑपरेशन देवेंद्र’वर फडणवीसांची सडकून टीका

मुंबई/28 जून-महाराष्ट्रातील 14 कोटी जनता आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार करत, कोणीही माझे पंख छाटू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यांनी ठाकरेसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशन देवेंद्र या विधानालाही फारसे महत्त्व दिले नाही. वाढवण बंदर आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पालघर जिल्ह्याला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शुक्रवारी मुंबई ते नागपूर दरम्यान उद्धव ठाकरे आणी फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते, मात्र फडणवीस यांनी हा केवळ एक योगायोग असल्याचे सांगत या चर्चा फेटाळून लावल्या. राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी याला वेड्यांचा बाजार असे म्हटले. दोन नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास करणे यात काहीही असामान्य नसल्याचे नमूद केले. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशन देवेंद्र या विधानाचीही खिल्ली उडवली. आपल्याला पंखच नसल्यामुळे कोणीही ते छाटू शकत नाही, असे ते म्हणाले.




