40 लाख शेतकर्यांना मिळणार विनाअट कर्जमाफी-मुख्यमंत्री
‘मोदी केवळ सर्वाधिक काळ पंतप्रधान नाहीत, तर सर्वोत्कृष्टही

मुंबई/12 जून- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कामगिरीचा गौरव केला.
पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवरही भूमिका मांडली. शेतकर्यांनी सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. जनावरांसाठी वैरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीबाबत सरकारने उपसमिती स्थापन केली असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे, तर शेतकर्यांच्या हितासाठी निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोयाबीन आणि कापूस या पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाऊन पीकपद्धतीत बदल करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकर्यांना केले.
देशाची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवहार, महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मूलन आणि जागतिक स्तरावरील भारताची वाढती प्रतिष्ठा यांचा उल्लेख करत फडणवीस यांनी मोदी यांना केवळ सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान नव्हे, तर देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असे संबोधले. याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरही टीका करत काँग्रेसला बुडते जहाज म्हटले.
मोदींनी मोडला नेहरूंचा विक्रम-फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ निवडून आलेल्या पंतप्रधानांचा विक्रम मोडला आहे. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या वतीने त्यांनी मोदी यांचे अभिनंदन केले.त्यांच्या मते, एखाद्या नेत्याचा कार्यकाळ किती मोठा आहे यापेक्षा त्या काळात देशासाठी काय काम झाले हे अधिक महत्त्वाचे असते. मोदी यांनी जगभरात भारताची प्रतिष्ठा उंचावली असून आज एनडीए देशातील 22 राज्यांमध्ये सत्तेत आहे. देशाच्या सुमारे 80 टक्के भूभागावर एनडीएची सरकारे आहेत, असे त्यांनी सांगितले.




