पक्षहिताआड आल्यास कडक निर्णय घेणार

सुनेत्रा पवारांचा इशारा

मुंबई /11 जून : षण्मुखानंद सभागृहात आज (11 जून) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 27 वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार गटातील नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झालेल्या सुनेत्रा पवार यांनी वर्धापनदिन सोहळ्यात पहिल्यांदा भाषण केलं. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अजितदादा कडक निर्णय घ्यायचे, ते निर्णय घेण्याचा माझा स्वभाव नसला तरी मी त्याप्रमाणे निर्णय घेईल. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आज पक्षाचा 27 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करताना भावनिक वातावरण आहे. कारण आपल्या सर्वांचे नेते अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय साजरा होणारा हा पहिलाच वर्धापन दिन सोहळा आहे. अजितदादांना विकसीत महाराष्ट्र प्रेरीत होता. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वेगळ्या परिस्थितीत मी जबाबदारी घेतली आहे. पण अजितदादांनंतर येणार्‍या सगळ्या गोष्टींची मला जाणीव होती. पदाधिकारी कार्यकर्ता आणि त्यांची निष्ठा माझ्या लक्षात आहे. त्यामुळे योग्यवेळी त्या सर्वांना संधी दिली जाईल. तसेच आतापर्यंत जे घडलं ते मी समजून घेतलं आहे. त्यामुळे यापुढे मी पक्षाच्या हिताला प्राधान्य देईल आणि कुणाचा हस्तक्षेप असेल तर मी लक्ष देईल. अजितदादा कडक निर्णय घ्यायचे, तसे निर्णय घेण्याचा माझा स्वभाव नसला तरी मी त्याप्रमाणे निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु सुनेत्रा पवार यांनी इशारा कोणाला दिला, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजित पवार यांना जो महाराष्ट्र अपेक्षित होता, तसा महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा मला विश्वास आहे. यासाठी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची राष्ट्रवादीची विचारधारा पुढे घेऊन जाणं याचाच अर्थ सर्वांना बरोबर घेऊन जाणं आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, येथील प्रत्येक तळागाळातील प्रत्येक घटकांनी यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे समर्पन, संघर्ष आणि संकल्प ही आजच्या आपल्या वर्धापन दिनाची थीम ठरवली होती. ही संकल्पना आणि यंदाचा वर्धापन दिन सोहळा अजितदादांना समर्पित केलेला आहे. अजितदादांनी पक्षाच्या बळकटीसाठी गेले अनेक वर्ष पूर्णपणे स्वत:ला समर्पित केलं होतं. त्यामुळे आपण सुरुवातीलाच अजितदादांसाठी ही समर्पनाची भूमिका घेतली आहे, असे मत सुनेत्रा पवार यांनी यावेळी मांडले.

संबंधित बातम्या

Back to top button