अमरावतीत रेल्वे रुळावर युवकाचा संशयास्पद मृत्यू

सुशील नगर रेल्वे रुळावर शिवा सरकटेचा मृतदेह आढळला

* घातपाताच्या संशयाने जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
* इर्विनला पोलिस छावणीचे स्वरूप; पोलिसांच्या मध्यस्थीने तणावपूर्ण शांतता

अमरावती/22 मार्च : शहराच्या शांततेला सुरुंग लावणारी एक भीषण घटना सुशील नगर रेल्वे रुळावर उघडकीस आली असून, 24 वर्षीय शिवा राजू सरकटे याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा निव्वळ अपघात नसून काळजाचा थरकाप उडवणारा घातपात असल्याचा खळबळजनक आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेचे पडसाद जिल्हा सामान्य रुग्णालयात उमटले असून, संतप्त जमावाचा आक्रोश आणि पोलिसांचा कडा पहारा यामुळे इर्विन रुग्णालय परिसर छावणीचे स्वरूप धारण करून होता. सोमवारी सकाळच्या सुमारास अमरावती ते बडनेरा या लोहमार्गावर एका युवकाचा छिन्नविच्छेदन झालेला मृतदेह पडल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने राजापेठ पोलिसांना दिली. मृत युवक हा दसरा मैदान झोपडपट्टी परिसरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न होताच परिसरात शोककळा पसरली. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि मृतदेहाची अवस्था पाहून हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याची शंका नातेवाईकांनी उपस्थित केली आहे. आमच्या पोराचा बळी घेण्यात आला आहे, असा टाहो फोडत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला, ज्यामुळे तेथील वातावरण कमालीचे तापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी आपल्या विशेष शोध पथकासह (डीबी स्क्वॉड) तातडीने रुग्णालय गाठले. जमावाचा वाढता संताप पाहता शीघ्र कृती दलाच्या (क्यूआरटी) जवानांना पाचारण करण्यात आले. सहायक पोलीस आयुक्तांनी स्वतः मैदानात उतरून नातेवाईकांशी चर्चा केली. पोलिसांनी रेल्वेकडून प्राप्त झालेली अधिकृत माहिती नातेवाईकांसमोर ठेवली, तरीही लोकांचा संताप शांत होत नव्हता. अखेर, शवविच्छेदन अहवालात जर सुईभरही संशयास्पद आढळले, तर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे ठोस आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर तणाव निवळला. सध्या पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली असली, तरी घातपाताच्या अंगाने तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button