10 लाख लोकसंख्येच्या अमरावतीला 200 बसची गरज, धावताहेत फक्त 11

खासगी कंत्राटदारांच्या रॉयल्टीपायी नागरिक त्रस्त; सार्वजनिक वाहतुकीचे भयान वास्तव

अमरावतीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली; ऑटोमु ळे वाढले प्रदुषण

महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे बससेवेचा बोजवारा; पर्यावरण शास्त्रज्ञांचा धक्कादायक अहवाल

अमरावती/5जून- शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या अत्यंत बिकट अवस्थेत असून, महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे तब्बल 10 लाख नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
निसर्ग संरक्षण संस्था आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून या परिस्थितीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहराचा 125 चौरस किलोमीटरचा विस्तार पाहता, येथे किमान 150 ते 200 बसेसची आवश्यकता असताना, प्रत्यक्षात केवळ 11 बसेस अवघ्या 6 मार्गांवर धावत आहेत. या विदारक परिस्थितीला महापालिकेचे चुकीचे धोरण कारणीभूत असल्याचे अहवालात स्पष्ट म्हटले आहे. महापालिकेकडून खासगी कंत्राटदारांकडून प्रति किलोमीटर 5.23 रुपये रॉयल्टी वसूल केली जात असल्यामुळे कंत्राटदार सेवा पुरवण्यास असमर्थ ठरत आहेत. शहरासाठी आवश्यक असलेल्या 32 प्रमुख मार्गांवर आजही पुरेशी बससेवा उपलब्ध नाही. सार्वजनिक वाहतुकीचा हा बोजवारा उडाल्यामुळे शहरात ऑटो रिक्षांची संख्या बेसुमार वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तसेच, बसेसमधील अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, शहराला अद्याप केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री योजनेतील ’ई-बसेस’चा लाभही मिळालेला नाही. पर्यावरण दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष राजेश एकघरे आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. एस.पी. इंगोले यांनी हा अहवाल प्रसिद्ध करून प्रशासनाला आरसा दाखवला आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी तातडीने आधुनिक संगणकीय नियोजन व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वेळ नियंत्रण प्रणाली लागू करणे काळाची गरज बनली आहे. खासगी कंत्राटदारांकडून रॉयल्टी घेण्याऐवजी त्यांना अनुदान देऊन सेवा सुधारण्यावर भर द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोपर्डे आणि प्रा. डॉ. मनीषा जाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्ञा मेहेत्रे, तेजल तायडे, नरसोबा गेडाम आणि राहुल पेंडोर या विद्यार्थ्यांनी या अभ्यासासाठी मेहनत घेतली असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button