16 नाल्यांची स्वच्छता मोहीम पूर्णत्वाकडे
मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेत मनपा प्रशासन अग्रेसर

नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळण्याची आशा
अमरावती/29 मे- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीवर महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, 16 पैकी 14 नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. उरलेल्या दोन नाल्यांचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून, आगामी आठवड्यात ते काम पूर्ण होणार आहे. शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या विशेष आमसभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने आता युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. बुधवार 27 मे रोजी मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील 16 नाल्यांपैकी 14 नाल्यांची स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. उर्वरित दोन नाल्यांपैकी ‘अंबा नाला’ आणि ‘कोठडिया नगर’ येथील नाल्याचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील आठवड्यापर्यंत ते काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात नद्या व नाल्यांना पूर आल्यानंतर हे पाणी थेट शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि प्रमुख चौकांमध्ये शिरते. यामुळे नागरिकांना दरवर्षी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेता, यंदा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. मात्र, अद्याप काही भागांत छोट्या नाल्यांची स्वच्छता अत्यंत संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा शहरात पाणी साचण्याची समस्या उद्भवणार का, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शहरातील मुख्य आणि उपनाल्यांची एकूण संख्या 16 असून, दरवर्षी या कामावर लाखो ते करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो. तरीही पावसाळ्यात अनेक परिसरांमध्ये पाणी साचते, ज्यावर प्रशासकीय नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत नालेसफाईवर अधिक खर्च करण्यात आला असून, गाळ काढण्यासाठी यंत्रांचा वापर वाढवण्यात आला आहे. नाल्यांवरील अतिक्रमणे, प्लास्टिक कचर्याचे ढीग आणि वेळेवर गाळ न काढणे यांसारख्या कारणांमुळे पाणी तुंबण्याची समस्या गंभीर होते. प्लास्टिक बंदी असूनही नाल्यांमध्ये सर्वाधिक प्लास्टिक कचरा आढळून येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने नालेसफाईची मोहीम आक्रमकपणे राबवण्यास सुरुवात केली आहे.
मनपाचा दावा फोल; अनेक नाले तुडुंब
अमरावती महानगरपालिका अंतर्गत 16 मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असून शहरातील बहुतांश उर्वरित नाले अद्यापही कचर्याने तुडुंब भरलेले आहेत. याचाच प्रत्यय प्रभाग क्रमांक 22 मध्ये येत असून, येथील दत्त मंदिरच्या पाठीमागील नाला अद्याप साफ करण्यात आलेला नाही. परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. असे असतानाही, संबंधित मनपा कर्मचारी मात्र ’आम्ही नाला साफ केला’ असा खोटा दावा करत आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही अनेक प्रभागांत नालेसफाई झालेली नाही. मनपाच्या या संथ कारभारामुळे व कर्मचार्यांच्या कामचुकारपणामुळे आगामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.




