मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा
मंत्री डॉ. अशोक उईके यांचे प्रतिपादन

अमरावती /18 मे: मेळघाटच्या डोंगरदर्यांतील चिखलदरा आणि धारणी या आदिवासीबहुल दत्तक तालुक्यांच्या मागासलेपणाचा डाग पुसण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्वच प्रशासकीय विभागांशी घट्ट मेळ घालत विकासकामांना गती द्यावी, जेणेकरून नागरिकांचे मूलभूत प्रश्न तात्काळ सुटू शकतील, असे खडे बोल आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी धारणी येथील महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत सुनावले. या बैठकीत केवळ शासकीय कामांवर चर्चा झाली नाही, तर थेट दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यापासून ते शेती आणि शिक्षणापर्यंतच्या सर्वच जिवंत प्रश्नांवर प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरण्यात आले.
बैठकीत कुपोषण, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि क्षयरोग यांसारख्या गंभीर आजारांवर स्वतंत्रपणे ऊहापोह करण्यात आला. पावसाळा तोंडावर असल्याने दुर्गम पाड्यांतील कुपोषणमुक्तीसाठी गावोगावी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे कडक निर्देश मंत्र्यांनी दिले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करणे, तेथील वैद्यकीय अधिकार्यांची रिक्त पदे भरणे आणि औषधोपचार यंत्रणा अधिक बळकट करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. शासकीय योजनांची माहिती केवळ कागदावर न राहता ती प्रकल्प कार्यालयाच्या सूचना फलकावर जनतेसाठी मांडली जावी. यात अर्जाची पद्धत, लागणारी कागदपत्रे आणि लाभार्थ्यांची नावे उघडपणे लावण्याचे आदेश देण्यात आले. बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत शेतकर्यांना केवळ विहिरी न देता सौरऊर्जा संच, जलवाहिनी, तुषार सिंचन आणि पाणी उपसा करणारे पंप अशी संपूर्ण मदत एकाच वेळी देऊन आदिवासी शेतकरी राजाला सुखी करण्याचा संकल्प सोडण्यात आला.
दुर्गम भागातील खारी आश्रमशाळेतील वीज पुरवठ्याची आणि कमी दाबाची मोठी समस्या लक्षात घेता, तेथे तात्काळ स्वतंत्र रोहित्रे (डीपी) बसवण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले. तसेच तारूबांदा गावातील विजेचे खांब वाढवणे, रायपूर आश्रमशाळेच्या रस्त्याला मंजुरी देणे आणि 15 जूनपूर्वी सर्व शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण जनतेच्या भावनांचा आदर करत प्रत्येक गावात हक्काची स्मशानभूमी आणि तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्याच्या सूचनाही डॉ. उईके यांनी दिल्या. या बैठकीला आमदार केवळराम काळे, प्रभूदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनील चौथमल, अप्पर आयुक्त आयुषी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आरोग्य उपसंचालक डॉ. तुषार वारे आणि रमेश मावसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीपूर्वी मंत्र्यांचे धारणी येथील विश्रामगृहात आदिवासी पारंपरिक पद्धतीने ’गदली सुसुन’ हे नृत्य करत स्वागत करण्यात आले आणि सकाळी त्यांनी तारूबांदा येथील कांद्रीबाबा हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले.




