भातकुली पेट्रोल पंपावर तुफान गर्दी
पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड

भातकुली /25 मार्च : तालुक्यातील पेट्रोल पंपांवर आज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी रांगा लावल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेषतः दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची मोठी उपस्थिती दिसून आली. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. काही नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, तर काही ठिकाणी किरकोळ वादही झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पेट्रोल दरवाढीची शक्यता, तसेच पुरवठ्याबाबत पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांनी घाईघाईत पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केल्याचे सांगितले जात आहे.प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पेट्रोल पंप व्यवस्थापनानेही सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.




