विदर्भात उष्णतेची लाट; ट्रान्सफॉर्मरलाही फुटला घाम
सुरळीत विजेसाठी महावितरणची धडपड, पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षेसाठी कुलरचा वापर

अमरावती/29 एप्रिल: विशेषता पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट पसरली असून तापमानाने 47ओ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होऊ नये आणि ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणने महत्त्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी विशेष कुलर बसविण्यात येत आहेत.
महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्रांमध्ये सामान्यतः एक किंवा दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यरत असतात. या ट्रान्सफॉर्मरची क्षमता साधारणतः 5 किंवा 10 एमव्हीए इतकी असल्याने एका ट्रान्सफॉर्मरद्वारे हजारो वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. या उपकरणांच्या कार्यक्षमतेसाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये असलेले ऑइल अत्यंत महत्त्वाचे असते. हे ऑइल उष्णता नियंत्रणासाठी आणि इन्सुलेशनसाठी वापरले जाते. मात्र, तापमानात लक्षणीय वाढ झाल्यास हे ऑइल अतिउष्ण होऊन त्याचे गुणधर्म बदलू शकतात, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड किंवा ओव्हरहिट होण्याचा, बिघाड होण्याचा किंवा अगदी आग लागण्याचाही धोका निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर महावितरणच्या 33/11 केव्ही उपकेंद्रांमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मरला कुलरच्या साहाय्याने ट्रान्सफॉर्मरच्या बाह्य पृष्ठभागावर थंड हवा पुरवून त्यांचे तापमान नियंत्रितान ठेवून संभाव्य बिघाड टाळण्याचे प्रयत्न महावितरणकडून करण्यात येत आहे. शिवाय पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तर, याचा मोठा फटका हजारो ग्राहकांना आणि जास्त कालावधी साठी पडू शकतो, त्यामुळे पॉवर ट्रॉन्सफॉर्मरला वाचविण्याच्या प्रयत्नात महावितरणची दमछाक होत आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाबरोबरच विजेच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याने संपूर्ण वीज वितरण यंत्रणेवर ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत महावितरणचे कर्मचारी उष्णतेची पर्वा न करता खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.




