अमरावती शिक्षक निवडणुकीत चुरस वाढली
नुटाचा दिलीप कडू, अदिती पोहरे, प्रशांत विघे, अविनाश बोर्डे यांना पाठिंबा

शिक्षकांच्या हक्कासाठी सभागृहात जाणकार प्रतिनिधी हवा
मतदारांनी स्वविवेकाने पहिल्या पसंतीचे मतदान करावे
अमरावती /18 ऑक्टोबर- अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी नुटा संघटनेने आपली महत्त्वाची भूमिका जाहीर केली असून रिंगणातील चार उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अमरावती विभागातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, सेवाशर्ती आणि हक्काच्या मागण्या विधीमंडळात मांडण्यासाठी सक्षम उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन संघटनेने मतदारांना केले आहे. प्रा.डॉ.प्रशांत विश्वेश्वर विघे, प्रा.अदिती ऋषिकेश पोहरे, दिलीप भीमरावजी कडू, डॉ.अविनाश मधुकरराव बोर्डे या चार उमेदवारांपैकी एकाला पहिल्या पसंतीचे मतदान करून उर्वरितांना पुढील पसंती देण्याचा सल्ला संघटनेच्या कार्यकारी मंडळाने दिला आहे.
विधानपरिषदेवर शिक्षक प्रतिनिधी पाठवण्यासाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी अमरावती विभागात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटना म्हणजेच नुटाने अमरावती विभागातील लढतीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. संविधानाने शिक्षकांना विधिमंडळात स्वतंत्र स्थान दिले असून शिक्षकांचे नेतृत्व करणार्या व्यक्तीकडे कायदेशीर ज्ञान, संसदीय आयुधांचा सखोल अभ्यास आणि प्रश्नांची जाण असणे काळाची गरज बनली आहे.
यंदाच्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघात शिक्षक आणि अ-शिक्षक उमेदवारांचा वाद चांगलाच पेटला आहे. एकही दिवस शिक्षकी पेशात काम न केलेले अनेक उमेदवार मैदानात उतरल्याने मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. संविधानाने सर्वांना निवडणूक लढवण्याची मुभा दिली असली तरी शिक्षकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा आणि रस्त्यावरील आंदोलनाची ताकद ओळखणारा प्रतिनिधी सभागृहात जावा, अशी भावना व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर न्याय मिळवण्यासाठी विधीमंडळ, न्यायालयीन संघर्ष आणि रस्त्यावरील आंदोलन हे तीनच प्रमुख मार्ग असल्याचे मत संघटनेने मांडले आहे. अमरावती विभागातील शिक्षक मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या
स्वविवेकाचा वापर करून योग्य उमेदवाराची निवड करावी. रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी प्रा.डॉ.प्रशांत विश्वेश्वर विघे, प्रा.अदिती ऋषिकेश पोहरे, दिलीप भीमरावजी कडू, डॉ.अविनाश मधुकरराव बोर्डे यांच्यामधून मतदारांनी पसंतीप्रमाणे क्रमांक 1 चे मतदान करावे आणि उर्वरित तीन उमेदवारांना 2, 3 आणि 4 चा पसंतीक्रम द्यावा, असे जाहीर आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रवीण रघुवंशी, सचिव डॉ.नितीन सी. काँगरे यांनी केले आहे.
उमेदवारांची पसंतीनुसार निवड
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी प्रा.डॉ.प्रशांत विश्वेश्वर विघे, प्रा.अदिती ऋषिकेश पोहरे, दिलीप भीमरावजी कडू, डॉ.अविनाश मधुकरराव बोर्डे या चार उमेदवारांना संघटनेने पसंती दिली आहे. मतदारांनी या चौघांपैकी एकाला पहिल्या पसंतीचे तर उर्वरित उमेदवारांना 2, 3 आणि 4 क्रमांकाचे मतदान करून शिक्षकांचा हक्काचा आवाज विधिमंडळात पाठवावा.
हक्काच्या लढ्यासाठी तीन प्रभावी मार्ग
शिक्षकांच्या मागण्या आणि हक्क मिळवण्यासाठी केवळ आश्वासने पुरेशी नसून तीन मार्ग अत्यंत महत्त्वाचे ठरतात. विधीमंडळात संसदीय आयुधांचा प्रभावीपणे वापर करणे, कायदेशीर हक्कासाठी न्यायालयात दाद मागणे आणि शासन निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणे हे ते मार्ग आहेत. या तिन्ही मार्गांवर ठामपणे चालणारा प्रतिनिधीच शिक्षकांचे भविष्य सुरक्षित करू शकतो, असे नुटाने नमूद केले.





