परतवाड्याच्या सहा पोलीस कर्मचार्यांची तडकाफडकी बदली
तपासात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल

अमरावती/ 15 एप्रिल– परतवाडा येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तपासावर स्थानिक पातळीवरून कोणताही दबाव येऊ नये आणि पीडितेला न्याय मिळावा, या उद्देशाने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे. या अंतर्गत परतवाडा आणि अचलपूर पोलीस ठाण्यातील सहा कर्मचार्यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तपासात निष्पक्षता राखण्यासाठी ’दखड’ या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून, हे पथक आता या संपूर्ण गुन्ह्याचा मुळापासून छडा लावणार आहे.
परतवाडा येथे घडलेल्या या निंदनीय घटनेमुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक पोलीस प्रशासनावर संशयाचे मळभ येऊ नये, यासाठी प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवण्यासाठी आणि पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी कर्मचार्यांच्या बदल्यांचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. अचलपूर आणि परतवाडा पोलीस ठाण्यातील ज्या कर्मचार्यांची बदली करण्यात आली आहे, त्यांना तात्काळ प्रभावाने अमरावती ग्रामीणच्या नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बदली प्रक्रियेमध्ये परतवाडा पोलीस ठाण्यातील शेख सलीम शेख, मुख्य आरक्षक अब्दुल नाझीम अब्दुल कलीम (बकल क्रमांक- 417), पोलीस शिपाई शुभम दिलीप वर्मा (बकल क्रमांक-767) आणि मयूर सदानंद राव गुरव (बकल क्रमांक- 990) यांचा समावेश आहे. तसेच अचलपूर पोलीस ठाण्यातील मुख्य आरक्षक मोहनतपासात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊलधनराज वावरे (बकल क्रमांक- 1169) व पुरुषोत्तम मधुकर बावनेर (बकल क्रमांक- 1489) यांनाही मूळ ठिकाणाहून हटवून नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाने दिलेला हा स्पष्ट संदेश मानला जात आहे की, तपासात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. विशेष तपास पथकामार्फत आता या प्रकरणातील प्रत्येक धागादोरा तपासला जाणार आहे. तांत्रिक पुरावे गोळा करणे, संबंधित व्यक्तींची कसून चौकशी करणे आणि गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचणे हे या पथकाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. पोलीस प्रशासनाने जनतेला आश्वस्त केले आहे की, या प्रकरणाचा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण केला जाईल. आगामी काळात या तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, गुन्हेगारांना कायद्याचा कठोर दणका देण्यासाठी सज्ज झाले आहे.
तपासासाठी विशेष पथकाची मोहोर-प्रकरणाची दाहकता पाहता पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तपासासाठी ’दखड’ नावाचे विशेष पथक स्थापन केले आहे. हे पथक कोणत्याही दबावाशिवाय पुराव्यांची पडताळणी करेल. तपासात पारदर्शकता राहावी आणि संशयाला जागा उरू नये, यासाठी प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.




