बळीराजावर खत दरवाढीचे संकट

आंतरराष्ट्रीय युद्धामुळे खते प्रचंड महाग

केंद्र सरकारने अनुदान वाढविण्याची मागणी

अमरावती/25एप्रिल– खरीप हंगाम अगदी उंबरठ्यावर आला असून अमरावती जिल्ह्यातील बळीराजासाठी खतांच्या दरवाढीचे मोठे संकट उभे राहिले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे खतनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वधारल्या आहेत. याचा थेट फटका खतांच्या दरांना बसला असून खतांच्या किमती दहा ते पंच्याऐंशी टक्क्यांनी वाढल्या आहेत. शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चात यामुळे मोठी भर पडणार असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाजारातील उपलब्ध माहितीनुसार 10:26:26 खताचा दर 1800 वरून 2250 रुपये झाला असून त्यात 25 टक्के वाढ झाली आहे. तसेच 19:19:19 चा दर 2075 वरून 2300 रुपये तर 20:20:13 चा दर 1550 वरून 1800 रुपयांवर पोहोचला आहे. 24:24:00 खताचा दर 1800 वरून 2200 रुपये झाला आहे. डीएपी खतासाठी आता 1400 ऐवजी 1750 रुपये शेतकर्‍यांना मोजावे लागणार आहेत. सर्वात मोठा फटका एमओपी खताला बसला असून 350 रुपयांचे खत आता थेट 650 रुपयांवर म्हणजेच 85 टक्क्यांहून अधिक किमतीने विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे युरिया अमोनिया पोटॅश सल्फर आणि फॉस्फोरिक सिडच्या आयातीवरही मोठा परिणाम झाला आहे. भारताची खतांची मोठी गरज आयातीवर अवलंबून असल्याने या दरवाढीचा फटका थेट आपल्या शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने खतांवरील अनुदानात 20 हजार कोटी रुपयांची वाढ करून एकूण 1 लाख 86 हजार कोटी रुपयांचे अनुदान अर्थसंकल्पात तरतूद केले आहे. सरकार फॉस्फेट आणि पोटॅश खतांवरील अनुदान वाढवण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्ष शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांच्या खिशावर याचा मोठा बोजा पडणार हे नक्की. खतांच्या आयातीवर अवलंबून असलेल्या विविध घटकांच्या किमती 17 ते 600 टक्क्यांपर्यंत वाढल्याने ही दरवाढ अनिवार्य झाली आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button