महिलांची बदनामी आता ठरणार महागात
कायद्याचा बडगा तीन वर्षे कारावास होणार

विधीमंडळात मंजुरी सुरक्षेचे नवे पर्व सुरू
अमरावती /12 एप्रिल– बदलत्या काळात संगणकीय माध्यमांतून महिलांची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे दाहक वास्तव समोर ठेवून राज्य सरकारने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महिलांची विटंबना करणार्या विकृतांना आता चाप बसणार असून, कोणत्याही महिलेचे अश्लील चित्रफीत, छायाचित्र किंवा आक्षेपार्ह मजकूर सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणे अथवा तशी धमकी देणे हा आता केवळ साधा गुन्हा उरणार नाही, तर तो लैंगिक अपराधाच्या श्रेणीत मोडला जाईल.
विधीमंडळात या संदर्भातील विधेयकाला मंजुरी मिळाली असून, लवकरच याची अंमलबजावणी कठोरपणे सुरू होणार आहे. या नवीन कायद्यानुसार केवळ छायाचित्रांशी छेडछाड करणेच नव्हे, तर चोरून काढलेले चित्रीकरण पसरवणे, सामाजिक माध्यमांवर बदनामीकारक मजकूर लिहिणे, खासगी संवाद सार्वजनिक करण्याची धमकी देणे आणि ई-टपाल किंवा संदेशाद्वारे त्रास देणे या सर्व बाबी आता गंभीर गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दोषी आढळणार्या व्यक्तीला आता तीन वर्षांपर्यंतचा सक्त मजुरीचा कारावास आणि मोठा आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगाराची संगणकीय नोंद कायमस्वरूपी डागाळलेली राहील, ज्यामुळे त्याला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल. पूर्वी चर्चेत असलेल्या ’शक्ती’ कायद्यातील अतिशय कडक तरतुदींचा आता भारतीय न्याय संहितेत समावेश करण्यात आला असून, यामुळे महिलांना कायद्याचे भक्कम कवच प्राप्त झाले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात संगणकीय छळाच्या 120 ते 125 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यातील 100 हून अधिक प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कायद्यातील सर्वात संवेदनशील बदल म्हणजे आम्ल हल्ला पीडित महिलांची ओळख आता कोणत्याही स्तरावर जाहीर केली जाणार नाही. तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान त्यांचे नाव व पत्ता गुप्त ठेवणे बंधनकारक असेल, जेणेकरून त्या सन्मानाने जीवन जगू शकतील. या संदर्भात अमरावती शहर सायबर कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांनी महिलांना आवाहन केले आहे की, सामाजिक माध्यमांवर वावरताना खबरदारी घ्यावी, अनोळखी व्यक्तींच्या विनंतीचा स्वीकार करू नये आणि दुहेरी सुरक्षा प्रणालीचा वापर करावा. कोणतीही भीती न बाळगता महिलांनी समोर येऊन तक्रार करावी, कारण तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्हेगाराला तातडीने बेड्या ठोकणे आता पोलिसांसाठी अधिक सुलभ झाले आहे. जर असा त्रास होत असेल, तर घाबरून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवावी आणि पुराव्यासाठी आक्षेपार्ह संदेशांचे छायाचित्र जपून ठेवावे.




