विषबाधेने तीन चिमुकल्यांचा मृत्यू

दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा

बुलढाणा /6 एप्रिल- बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे धक्कादायक घटना घडली आहे. आईसह चार मुलांना विषबाधा झाली होती. यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याने तीन लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला असून आई व एक चिमुकलीवर उपचार सुरु आहेत. अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे.
मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय 4), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय 7) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय 8) या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय 34) आणि अश्मिरा वसीमजमदार (वय 3) यांच्यावर बुलढाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रविवारीपासूनच या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. सोमवारी सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अली व मशिरा यांचा मृत्यू झाला. आई अफरीन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, फातिमा व अश्मिरावर बालरोगतज्ज्ञांकडे उपचार करण्यात येत होते. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास फातिमा हिचाही मृत्यू झाला. सध्या अश्मिराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button