आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा
पवित्र पोर्टलचे नवे नियम लागू

* विना पोर्टल नियुक्त्यांचे ऑडिट होणार
अमरावती /5एप्रिल– राज्यातील हजारो डी.एड. आणि बी.एड. पदवीधर तरुणांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. उच्च न्यायालयाच्या कडक ताकीदीनंतर राज्य सरकारने ’पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठीची नवी कार्यप्रणाली जाहीर केली असून, 30 मार्च रोजी यासंदर्भातील महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुसाट होणार असून पारदर्शकतेवर अधिक भर दिला जाणार आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. आता प्रत्येक जिल्हा परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याचा संपूर्ण तपशील संच मान्यते नुसार पोर्टलवर प्रसिद्ध केला जाणार आहे. यामुळे उमेदवारांना आपल्या
जिल्ह्यातील
नेमकी स्थिती समजण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे राबविली जाणार असल्याने यात वशिला किंवा गैरप्रकाराला थारा उरणार नाही. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील (टीईटी) गुणांच्या गुणवत्तेनुसारच उमेदवारांची निवड केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट गुणवत्तेनुसार, तर खाजगी शाळांमध्ये एका जागेसाठी 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाणार आहे.या प्रक्रियेतील सर्वात मोठा धक्का म्हणजे, 22 जून 2017 नंतर पवित्र पोर्टलला बगल देऊन खाजगी शाळांमध्ये ज्या काही नियुक्त्या झाल्या आहेत, त्या आता सरकारच्या रडारवर आल्या आहेत. अशा बेकायदेशीर नियुक्त्यांचा सविस्तर अहवाल शासनाकडे प्राप्त झाला असून, त्या शिक्षकांच्या मान्यता धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित आणि कायम विनाअनुदानित अशा सर्वच शाळांमधील शिक्षकांचा समावेश आहे. एकूणच, नव्या नियमांमुळे प्रामाणिक आणि कष्टाळू उमेदवारांना हक्काची नोकरी मिळण्याची आशा पल्लवीत झाली असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.




