बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार
284 जागांवर दिले उमेदवार

नवी दिल्ली/29 मार्च – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने बंगालमधील विधानसभेच्या 294 पैकी 284 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष बंगालमध्ये एकाचवेळी भाजपा आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देणार आहे. आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीमधून काँग्रेसने आपल्या मुर्शिदाबाद आणि मालदा या पारंपरिक बालेकिल्ल्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी साठी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना त्यांच्या पारंपरिक बहरामपूर मतदार संघामधून उमेदवारी दिली आहे. तर हल्लीच तृणमूल काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेल्या मौसम नूर यांना मालतीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने भवानीपूर विधानसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात प्रदीप प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपाने शुभेंदू अधिकारी यांना रिंगणात उतरवले आहे. त्याशिवाय काँग्रेसने हेमताबाद येथून अनामिका राय यांना, तर जंगीपूर येथून मोहम्मद इमरान अली यांना उमेदवारी दिली आहे. तर तुफानगंज येथून देबेंद्रनाथ यांना आणि दिनहाटा येथून हरिहर राय यांना उमेदवारी दिली आहे.




