मनपामध्ये अग्निसुरक्षा बळकटीसाठी बैठक
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

अमरावती /23 मार्च : वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेता अमरावती शहराची अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक चोख करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांदक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिका सभागृहात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्तांनी अग्निशमन विभागाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने सदैव सज्ज आणि सतर्क राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
बैठकीच्या सुरुवातीला अग्निशमन दलाच्या कार्यप्रणालीचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये मागील काळातील आगीच्या घटनांचे विश्लेषण आणि विभागाच्या प्रतिसादाचा वेग यावर चर्चा झाली. शहरातील उंच इमारती, मोठी बाजारपेठ आणि शासकीय कार्यालयांमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होते की नाही, याची नियमित तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच, आपत्कालीन मदतीसाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने नियंत्रण कक्ष अधिक प्रभावी करण्यावर भर दिला. अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने भरणे, कर्मचार्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आणि विभागाची ताकद वाढवण्यासाठी आधुनिक उपकरणांची खरेदी करणे यावरही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्यासह संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रशासनाचे सर्वोच्च कर्तव्य असून, त्यात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.




