भाजप नगरसेविकांमध्ये धुमशान
ईश्वर चिठ्ठी चव्हाण, भुजाडेंच्या नावे; सुरेखा लुंगारेंची निवड कशी?

अमरावती /19 मार्च : स्थानिक महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपमध्ये स्वच्छता समितीच्या सदस्य निवडीवरून मोठे वादंग निर्माण झाले असून, पक्षांतर्गत लोकशाहीचा गळा आवळला गेल्याची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. मंगळवारी झालेल्या आमसभेपूर्वी सोमवारी भाजप कार्यालयात झालेल्या पूर्वतयारी बैठकीत महिला नगरसेविकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी चक्क ’ईश्वरी चिठ्ठी’चा आधार घेण्यात आला होता. या चिठ्ठीत पंचफुला चव्हाण आणि नूतन भुजाडे यांची नावे निघूनही प्रत्यक्ष आमसभेत मात्र सुरेखा लुंगारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
या प्रकारामुळे तोंड पाहून कामे होतात का? असा संतप्त सवाल महिला नगरसेविकांनी उपस्थित केला असून, भाजपमधील या अंतर्गत गटबाजीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महानगर पालिकेच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता भाजप कार्यालयात सर्व नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. स्वच्छता समितीमध्ये एकाही महिला सदस्याचा समावेश नसल्याने किमान दोन महिलांना संधी द्यावी, अशी आग्रही मागणी काही नगरसेविकांनी लावून धरली होती. कोणावरही अन्याय होऊ नये आणि पक्षात नाराजी पसरू नये, यासाठी अत्यंत पारदर्शक पद्धतीने ’ईश्वरी चिठ्ठी’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेत सर्वांसमक्ष दोन चिठ्ठ्या काढण्यात आल्या, ज्यात वडदळीच्या नगरसेविका पंचफुला चव्हाण आणि नूतन भुजाडे यांची नावे विजयी ठरली. उपस्थित सर्वच नगरसेवकांनी या दोन्ही महिलांचे अभिनंदनही केले. मात्र, मंगळवारी सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आमसभा सुरू झाली आणि नाट्यमय घडामोडींना वेग आला. महापौरांनी जेव्हा स्वच्छता समितीच्या सदस्यांची नावे जाहीर केली, तेव्हा त्यातून पंचफुला चव्हाण यांचे नाव गायब झाले होते. त्यांच्या जागी अचानक सुरेखा लुंगारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हा बदल पाहून सभागृहात उपस्थित असलेल्या भाजपच्याच इतर महिला नगरसेवकांना मोठा धक्का बसला. पक्षाच्या अधिकृत बैठकीत देवाधर्माच्या साक्षीनं काढलेली चिठ्ठी महापालिकेत येईपर्यंत बदलली कशी, असा प्रश्न आता विचारला जात आहे. या प्रकारामुळे भाजपमधील महिला लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड अस्वस्थता असून, नेत्यांनी शब्दाला जागले पाहिजे होते अशी कुजबूज गल्लीबोळातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
तडजोडीचे राजकारण की अंतर्गत गटबाजी?-पक्षाच्या बैठकीत सर्वांसमोर झालेला निर्णय आमसभेत फिरवला गेल्याने कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ईश्वरी चिठ्ठीत नाव असूनही डावलले गेल्याने पंचफुला चव्हाण आणि नूतन भुजाडे यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.




