इन्स्टाग्रामच्या नादातून बाहेर पडा

मुंबई/19 मार्च – सरकार तुम्हाला जाणीवपूर्वक आयपी एल, चित्रपट आणि मोबाईलमधील करमणुकीत गुंतवून ठेवत आहे, जेणे करून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकणार नाही. त्यामुळे या इन्स्टाग्रामच्या मोहजालातून तातडीने बाहेर या, असे परखड आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत केले. राज ठाकरे म्हणाले की, सध्या लोकांना सतत कोणत्या ना कोणत्या करमणुकीत व्यस्त ठेवण्याचे डिझाईन आखले गेले आहे. मोबाईल आता आपला एक अवयव झाला आहे. लोक आपला राग फक्त सोशल मीडियावर व्यक्त करतात, पण रस्त्यावर उतरून प्रश्न विचारत नाहीत. ही परिस्थिती राज्यासाठी आणि देशासाठी घातक आहे,अशी भीती त्यांनी व्यक्त केली. टीव्ही चॅनेलवर वरून दबाव आणला जातो, बातम्या दाबल्या जातात. जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचू दिली जात नाही. तुम्ही करमणुकीच्या या ’गटारगंगा’मध्ये वाहत गेलात, तर उद्या आपल्या आजूबाजूला काय बदलले हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही, कारण आपण मोबाइलमध्ये अडकलोय, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाराज ठाकरे म्हणाले, पुढील तीन वर्षे निवडणुका नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांकडून पैसे खायला सगळेच मोकळे आहेत. आज देशातही आहेत. धाकधूक सुरू आहे. भीषण परिस्थिती आहे. गॅस मिळत नाही. नेहमी नॉर्मलला असणारी लोक गॅसवर आहेत. खरं तर काही गोष्टी आपल्याकडून, पंतप्रधानांकडून राहून गेल्या, जो इराण इतकी वर्षे साथ देत नव्हता त्या इराणवर हल्ले होत आहेत. आपण इराणला साथ द्यायला हवी होती’.
’भारतात येणारं सगळं तेल हे इराणमधून येतं. ते आपल्याला रुपयात देतात. देत आले. पण खामेनेई गेल्यानंतरही भारताच्या पंतप्रधानांनी कुठलंही निषेधाचं स्टेटमेंट काढलं नाही. सरकार हल्ल्याविषयी काही बोलले नाही. त्याच्या मागे आपण अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही. याचा त्रास भविष्यात निश्चित होईल. सगळ्या बाजूने समजतच नाही. नेमके आपण कुठे, काय चाललो आहोत. या देशातील राज्ये, लोक, प्रगती कुठे होतेय, गेल्या जानेवारीत सभा झाली त्यावेळी अनेकांचे वाभाडे काढले, आपणही किती अडाणी आहोत हे सांगितले, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.




