अमरावतीत गावठी कट्टा अन् काडतुसांसह तरूण जेरबंद

गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

अमरावती /22 जून– अमरावती शहरात कंबरेत गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे बाळगून मोटारसायकलवरून फिरणार्‍या 21 वर्षीय तरूणाला गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीकडून कट्ट्यासह घातक शस्त्रे जप्त केली आहेत. अमरावती शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असतानाच ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अतुल आणि दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक सोमवारी गस्तीवर असताना त्यांना पवन उर्फ क्षितीज सुनील लोणारे या तरूणाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. हा तरूण डटेल कॉलेजजवळ पांढर्‍या रंगाच्या मोटारसायकलवर संशयास्पद स्थितीत उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, सहायक फौजदार गजानन सोनुने यांच्यासह सुनील लासुरकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, मंगेश परिमल, सचिन बहाळेे, जहिर शेख, मिर्झा नईम बेग, अतुल संभे, विकास गुडधे, विशाल वाकपांजर, योगेश पवार, राजीक रायलीवाले, चेतन गुल्हाने, संदीप खंडारे आणि राहुल दुधे यांचा समावेश होता. पोलिसांनी डटेल कॉलेजकडून वडालरी पुलाकडे जाणार्‍या मार्गावर पवन लोणारे याला घेराव घालून ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा, सहा जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि एक मोबाईल असा एकूण 1 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हा कट्टा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथील रहिवासी टव्या चव्हाण याच्याकडून घेतल्याची कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी आता या फरार टव्या चव्हाणच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध मोहीम तीव्र केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button