संतप्त नगरसेवकांनी अधिकार्यांना झापले
बेघरांच्या निवार्यात घाणीचे साम्राज्य

आरोग्याशी खेळू नका नगरसेवक अजय जयस्वाल यांचा कडक इशारा
अमरावती । 17 मार्च : प्रभाग 22 मधील शहरी बेघर निवारा केंद्राची दुर्दशा पाहून जनसेवकांचा पारा चढला. साचलेल्या सांडपाण्यामुळे बेघरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पाहून नगरसेवक अजय जयस्वाल यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ही केवळ कामातली कसूर नसून माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचे सांगत, तत्काळ साफसफाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
शहरातील प्रभाग 22 मधील बेघर निवारा केंद्रात सध्या दुरवस्थेचे सावट असून, या ठिकाणच्या मूलभूत सोयी-सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. या गंभीर परि स्थितीची दखल घेत नगरसेवक अजय जयस्वाल, नगर सेवक किशोर जाधव, नगर सेविका रजनीताई डोंगरे, गौरी ताई मेघवाणी आणि शैलेश मेघवाणी यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन पाहणी केली. केंद्राच्या परिसरात पोहोचताच उघड्यावरील तुंबलेल्या नाल्या आणि त्यातून सुटलेली प्रचंड दुर्गंधी पाहून लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला. निवारा केंद्रात राहणार्या निराधार आणि गरीब लोकांसाठी ही जागा सुरक्षित आहे की नरकवास, असा बोचरा सवाल यावेळी प्रशासनाला करण्यात आला. महानगरपालिकेच्या संबंधित अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना घटनास्थळी पाचारण करून अजय जयस्वाल यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. समाजातील शेवटच्या घटकाची जबाबदारी आपली आहे, हे समजून मनापासून काम करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकार्यांची खरडपट्टी काढली. येथे राहणार्या नागरिकांना जो मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल लोकप्रतिनिधींनी दिलगिरी व्यक्त केली. केवळ कागदोपत्री घोडे न नाचवता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करा आणि या परिसरातील सांडपाण्याची व्यवस्था तातडीने सुरळीत करा, असा सज्जड दम अजय जयस्वाल यांनी भरला. या केंद्रातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून बेघरांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित नगरसेवकांनी दिले. या प्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




