पवन लड्ढा प्रकरण : हल्लेखोरांवर त्वरित कठोर कारवाई करा
केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनची मागणी

-एक आठवड्याची मुदत, अन्यथा आंदोलन
-पोलिस आयुक्तांना शिष्टमंडळाचे निवेदन
अमरावती / 29 सप्टेंबर : शहरातील प्रतिष्ठित औषध व्यापारी आणि वारु फार्मा या होलसेल कंपनीचे संचालक पवन लड्ढा यांच्यावर 26 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास चिचफैल परिसरात असामाजिक तत्वांनी जीवघेणा हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात पवन लड्ढा गंभीर जखमी झाले. शहरातील सर्व औषध व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनने आज पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात हल्लेखोरांवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे अध्यक्ष सौरभ मालानी, जोन अध्यक्ष संजय बोकडे, सचिव राजा नानवानी आणि उपाध्यक्ष मनोज डफले यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका सामान्य नागरिकावर खुलेआम असा घातक हल्ला होणे हे अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे केवळ कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही, तर भविष्यात गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहन मिळण्याचा धोका आहे. अशा घटनांमुळे औषध व्यापारी आणि आरोग्यसेवेशी संबंधित व्यक्ती दहशतीच्या छायेत काम करण्यास भाग पडतात.
असोसिएशनने स्पष्ट केले की, जर एका आठवड्याच्या आत हल्लेखोरांविरुद्ध ठोस कारवाई झाली नाही तर औषध व्यवसाय बंद ठेवून आंदोलन छेडले जाईल. निवेदन सादर करताना अध्यक्ष सौरभ मालानी, जोन अध्यक्ष संजय बोकडे, सचिव राजा नानवानी, उपाध्यक्ष मनोज डफले, कोषाध्यक्ष तुषार कासट, संघटन सचिव सागर आंडे, सहसचिव विवेक कालबांडे, विजय खत्री, अंशुल अग्रवाल, तणवीर पटेल, रितेश बुब, भारती मोहोकार, सारंग सूर्यवंशी, रोशन कालबांडे, अतुल देशमुख, प्रकाश केला, आनंद अग्रवाल, सुयोग लड्ढा, राजेंद्र जाजू, शैलेश जाजू, कमल डागा, शीतलकुमार लोढा यांसह अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





