गांधी पूल वाचनालय घोटाळ्यावर जिल्हाधिकार्यांची चौकशी
78 लाखांच्या कामातील अनियमिततेवर प्रशासनाचे लक्ष

नगरपालिकेने 7 दिवसांत अहवाल सादर करावा
अचलपूर /11 मार्च : गांधी पूल परिसरातील सार्वजनिक वाचनालयाच्या प्रथम मजल्याच्या बांधकामात झालेल्या कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा दैनिक ‘आपली मातृभूमी’ने 27 फेब्रुवारी रोजी उचलून धरताच प्रशासन हलले असून आता जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील नगर विकास शाखेने अचलपूर नगरपरिषदेला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सह आयुक्त डॉ. विकास खंडारे यांनी मुख्याधिकारी, नगरपरिषद अचलपूर यांना पाठवलेल्या पत्रात या प्रकरणातील सर्व मुद्द्यांची सखोल तपासणी करून 7 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच कार्यवाहीचा अहवाल अर्जदारा लाही देण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गांधी पूल परिसरात सार्वजनिक वाचनालयाच्या प्रथम मजल्याचे बांधकाम करण्यात येत असून या कामाची अंदाजित किंमत 78,18,304 इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात काम अपूर्ण असतानाही संबंधित कंत्राटदाराला ठअ इळश्रश्री क्रमांक 1 ते 4 अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भात युवा सेना शहर प्रमुख लकी उर्फ आदर्श राजू चौबे यांनी 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत अपूर्ण कामाला पूर्णत्वाचा दाखला देऊन मोजमाप पुस्तिकेत नोंदी करण्यात आल्याचा, तसेच कंत्राटदाराला लाखो रुपयांचे देयक अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, 27 डिसेंबर 2025 रोजी मुख्याधिकार्यांच्या स्वाक्षरीने काम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षात मात्र वाचनालयाचे बांधकाम आजही अपूर्ण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने शासन निधीची उघड लूट झाली का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.तक्रारीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंत्राटदाराकडून शासन निधीची वसुली करावी, त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच दोषी अधिकार्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ‘आपली मातृभूमी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या धडाकेबाज बातमीमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले असून आता जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर या कथित घोटाळ्याची चौकशी कोणत्या टप्प्यावर पोहोचते आणि दोषींवर खरोखरच कारवाई होते की नाही, याकडे अचलपूरकरांचे लक्ष लागले आहे.




