ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी सरकार काय करीत आहे?

आ.संजय खोडके यांचा विधानपरीषदेत प्रश्न

* अमली पदार्थ तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करु- राज्यमंत्री कदम

अमरावती /10 मार्च – विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहरात सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीने अक्षरशः उच्छाद मांडला असून, तरुण पिढी या विळख्यात अडकत चालली आहे. या गंभीर विषयावर आमदार संजय खोडके यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. अमरावतीत हे अंमली पदार्थांचे साम्राज्य कोणाच्या आशीर्वादाने फोफावत आहे आणि या तस्करांना नक्की कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा थेट सवाल खोडके यांनी उपस्थित करताच सभागृहात मोठी खळबळ उडाली. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्राला या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गेल्या काही वर्षांत अमरावतीत अमली पदार्थांची विक्री वाढली असून, पोलिसांनी आतापर्यंत 29 गुन्हे नोंदवून 101 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंत्री कदम यांनी पुढे माहिती दिली की, अंमली पदार्थांची ही चोरटी वाहतूक आणि विक्री कायमची रोखण्यासाठी ’अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ (एएनटीएफ) नावाचा एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागाला अधिक अधिकार आणि अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे, अशा गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना पहिल्यांदाच विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत 3 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडून 4 जणांना अटक करण्यात आली होती, ज्याचा उल्लेख करत खोडके यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करेपर्यंत स्थानिक पोलिसांना याची खबर कशी लागली नाही, यात विभागातील काही लोकांचे संगनमत तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. यावर सरकारने कठोर चौकशीचे आश्वासन दिले असून अमरावतीला पुन्हा सुरक्षित करण्याचे वचन दिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button