मेळघाटात बच्चू कडूंनी उघडला ‘तिसरा डोळा’! थेट ‘तांडव’चा इशारा!

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांची चिखलदर्‍यात धाव

* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे श्रेय बच्चू कडूंना
* कडूंचा पालकमंत्री बावनकुळेंवर निशाणा आणि प्रशासनावर गंभीर आरोप
* मेळघाटातील रेतीवरच्या ’झिरो रॉयल्टी’चा मुद्दा गाजला, मंत्र्याकडून प्रश्न सोडवणुकीसाठी विशेष बैठक

अमरावती/9 मार्चआमच्या हातात त्रिशूळ आहे, आम्ही काहीही करू शकतो! जर आज दुपारी 4 वाजेपर्यंत सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर मेळघाटात थेट ’तांडव आंदोलन’ केले जाईल! अशा शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला ठणकावून सांगत रणशिंग फुंकले होते. मेळघाटातील आदिवासींच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी कडू यांनी काढलेल्या तब्बल 250 किलोमीटरच्या धडाकेबाज पदयात्रेचा आज चिखलदरा येथे समारोप झाला. मात्र, हा समारोप नसून एका मोठ्या संघर्षाची ही जळजळीत नांदी असल्याचे पाहायला मिळाले.
– मेळघाटातून सुटले वादळ; 250 किमीची पदयात्रा आणि सरकारला हादरा
गेल्या 9 दिवसांपासून मेळघाटातील रणरणत्या उन्हात, डोंगरदर्‍यांतून आणि काट्याकुट्यांतून ही ’मेळघाट संघर्ष यात्रा’ सुरू होती. 1 मार्चपासून निघालेल्या या पदयात्रेने संपूर्ण मेळघाट पिंजून काढला. मेळघाटातील आदिवासी आणि शेतकर्‍यांच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून ’जैसे थे’ आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. अशा परिस्थितीत जेव्हा बच्चू कडू यांनी ही यात्रा काढली, तेव्हा मेळघाटातील गावागावांतून त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हजारो आदिवासी, शेतकरी आणि विशेषतः दिव्यांग बांधवांनी या यात्रेत सहभाग नोंदवला. चिखलदर्‍याच्या दर्‍याखोर्‍यात बच्चू कडू तुम आगे बढो… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
चिखलदर्‍यातील आयटीआय मैदानावर आज हजारो समर्थकांसह बच्चू कडू यांनी ठिय्या मांडला. यावेळी वातावरण कमालीचे तापले होते. कडू यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता की, दुपारी 4 वाजेपर्यंत मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही, तर ’तांडव’ होईल. या इशार्‍यामुळे मंत्रालयातील यंत्रणा हादरली. तातडीने चक्रे फिरली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले दोन कॅबिनेट मंत्री उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांना थेट चिखलदर्‍याला रवाना केले. त्यांच्यासोबत शिंदे गटातील शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते. या मंत्र्यांनी मैदानात धाव घेत बच्चू कडू यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
जरा दमानं घ्या! : मुख्यमंत्री आणि बच्चू कडूंमधील मिश्किल संवाद-संवादादरम्यान बच्चू कडू यांनी आपली आक्रमकता कायम ठेवली. त्यांनी चिखलदर्‍यातील ’सिडको’ संदर्भातील प्रलंबित प्रश्नांची मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली. तसेच एक महत्त्वाची मागणी रेटली की, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना केवळ 50 हजार रुपये नव्हे, तर किमान दीड लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हसून प्रतिसाद दिला. ते म्हणाले, हो, नक्कीच त्याचा विचार करू, पण आता जरा दमानं घ्या! मुख्यमंत्र्यांचा हा मिश्किल आणि जिव्हाळ्याचा सल्ला चर्चेचा विषय ठरला.
रेती धोरण आणि आदिवासींच्या प्रतिनिधीत्वाचा मुद्दा-बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या रेती धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मध्य प्रदेशातून येणार्‍या रेतीवर ’झिरो रॉयल्टी’ लागते, तर महाराष्ट्रात मात्र मोठी रॉयल्टी भरावी लागते, ज्यामुळे स्थानिकांचे नुकसान होत आहे. तसेच, 1 लाख 40 हजार आदिवासी मतदारांनी आपला प्रतिनिधी निवडून विधानसभेत पाठवला आहे, त्यामुळे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
प्रशासन ’हाय अलर्ट’वर: चिखलदर्‍याला छावणीचे स्वरूप-बच्चू कडूंच्या या ’तांडव’ इशार्‍यामुळे पोलीस आणि तहसील प्रशासन पूर्णपणे ’हाय अलर्ट’वर होते. चिखलदर्‍यात ठिकठिकाणी पोलिसांचा कडा पहारा होता. आयटीआय मैदानावर होणार्‍या या सभेला हजारोंची गर्दी उसळली होती. आता गांधीगिरीचा टप्पा संपला असून, हातात त्रिशूळ घेऊन संघर्ष करू, या विधानाने प्रशासकीय यंत्रणांची झोप उडाली होती. सर्व सरकारी विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या ड्युटीवर सज्ज होते.
भविष्यातील पाऊल: विशेष बैठकीचे आश्वासन-मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री स्तरावर एक विशेष बैठक घेतली जाईल. यामध्ये आरोग्य, परिवहन, उद्योग आणि इतर विभागांशी संबंधित मेळघाटातील प्रश्नांवर चर्चा करून तातडीने निर्णय घेतले जातील. चिखलदर्‍यातील ’स्काय वॉक’ प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मेळघाटातील आशेचा किरण-गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मेळघाटातील आदिवासी आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांना बच्चू कडू यांच्या रूपाने एक नवा आशेचा किरण मिळाला आहे. 250 किमीची ही पायपीट केवळ पदयात्रा नव्हती, तर तो अन्यायाविरुद्धचा पुकारलेला एल्गार होता. सरकारने तूर्तास आश्वासनांची खिरापत दिली असली, तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत त्रिशूळ म्यान होणार नाही, असाच निर्धार बच्चू कडू आणि त्यांच्या हजारो समर्थकांनी व्यक्त केला आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा आणि प्रशासनावर गंभीर आरोप

सभेला संबोधित करताना बच्चू कडू यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, पालकमंत्री कदाचित इतर कामात व्यस्त असतील, त्यांना इथल्या आदिवासींच्या समस्यांची चिंता नाही. तसेच प्रशासनावर आरोप करताना ते म्हणाले की, प्रशासन आंदोलन दडपण्यासाठी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेत आहे. संपूर्ण आंदोलनादरम्यान आम्ही कोणतेही राजकीय वक्तव्य केले नाही, मात्र आता आम्हाला तसे करण्यास भाग पाडले जात आहे, असा इशारा त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद कर्जमाफीचे खरे मानकरी बच्चू कडूच!

या ऐतिहासिक आंदोलनाची दखल स्वतः उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांनी दूरध्वनीवरून थेट आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठी कबुली दिली. ते म्हणाले की, यावर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’चे संपूर्ण श्रेय थेट बच्चू कडू यांना जाते. त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरात जे प्रचंड आंदोलन केले होते, आजच्या या निर्णयाचे खरे शिल्पकार कडूच आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर जनसमुदायाने एकच जल्लोष केला.

संबंधित बातम्या

Back to top button