पोहरा जंगलातील विहिरीत मृतदेह आढळला

दारूच्या पार्टीत काटा काढल्याचा संशय

* मृतदेह जाळून विहिरीत टाकला
* हातावर पूजा नाव गोंदलेले
* शिराळा हत्याकांडाची पुनरावृत्ती

अमरावती / 1 मार्च : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्री तलाव ते मालखेड मार्गावर असलेल्या पोहरा बंदीस्त जंगलात एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला असून गुन्हेगारांचा अंगावर शहारे आणणारा क्रूर बनाव पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत साधारण पंचवीस ते तीस वर्षे वयोगटातील या तरुणाची हत्या करून ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह जाळण्याचा अघोरी प्रयत्न झाला असून ही विदारक घटना उघड होताच अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हादरून गेले आहे विशेष म्हणजे साडेतीन महिन्यांपूर्वी वलगाव हद्दीतील शिराळा शिवारात अशाच प्रकारे एका तरुणाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला होता त्या घटनेचा सुगावा अद्याप लागलेला नसतानाच आज पुन्हा पोहरा जंगलात त्याच क्रूरतेची पुनरावृत्ती झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मिळालेली सविस्तर माहिती अशी की छत्री तलाव परिसरातील पोहरा वर्तुळातील घनदाट जंगलात मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एक जुनी विहीर आहे उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वनविभागाचे अधिकारी कुन्हे हे या विहिरीच्या रंगरंगोटीचे काम पाहण्यासाठी रविवारी दुपारी तिथे पोहोचले असता त्यांना विहिरीच्या काठावर रक्ताचा सडा आणि एक अर्धवट जळालेला पांढरा सदरा दिसला संशय बळावल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना एका तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत तरंगताना दिसला त्यांनी तातडीने याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण आणि फ्रेजरपुरा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्णपणे कुजलेला होता घटनास्थळावर मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला असल्याने तिथे मद्यप्राशन करून मोठी पार्टी झाली आणि त्यानंतर झालेल्या वादातून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे मृत तरुणाच्या एका हातावर पूजा असे नाव गोंदलेले असून अद्याप त्याची अधिकृत ओळख पटलेली नाही विहिरीच्या काठावर मिळालेला अर्धा जळालेला सदरा आणि रक्ताचे डाग हे गुन्हेगारांनी पुरावा नष्ट करण्यासाठी रचलेला कट स्पष्ट करत आहेत. शिराळा शिवारातील त्या घटनेची आठवण या निमित्ताने ताजी झाली आहे 6 नोव्हेंबर 2025 रोजी शिराळा गावात एका तरुणाचा असाच जाळलेला मृतदेह आढळला होता वलगाव पोलिसांनी शहरभर हस्तपत्रके लावूनही त्या मृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही आता पोहरा जंगलातील या दुसर्‍या घटनेने गुन्हेगारांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे या दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याने ही एखादी सराईत टोळी तर नाही ना असा संशय आता बळावू लागला आहे या निर्जन जंगलात गुन्हेगारांचे दोन ते तीन अड्डे असल्याचे बोलले जात असून या खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलीस आता परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासत आहेत शवविच्छेदनानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असून पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

तपास पूजा नावा भोवती फिरण्याची शक्यता

शिराळा घटनेला साडेतीन महिने उलटूनही मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलीस रिकाम्या हातानेच आहेत आणि आता पोहरा जंगलात पुन्हा रक्ताचा सडा पडला आहे. हातावरील ’पूजा’ हे नाव आणि विहिरीकाठचा जळालेला शर्ट यातून पोलीस मारेकर्‍यांच्या मुसक्या आवळणार की ही केसही शिराळाप्रमाणेच गुलदस्त्यात राहणार का ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button