राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीवर 1 मार्चपासून कडक कारवाई
मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई/27 फेब्रुवारी – राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकी मुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असून, कायदेशीर वाहतूक व्यवस्थे सही मोठा फटका बसत आहे. अनेक वाहनांवर परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसतानाही प्रवासी ने-आण केल्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे, तसेच प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला (ठढज) 1 मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री सरनाईक यांनी विधानभवनात बोलावलेल्या बैठकीत स्पष्ट केले की, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, वाहनांची नियमित तपासणी न करणे आणि सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे या कारणांमुळे अपघातांची शक्यता अधिक वाढते. तसेच अशा वाहनांना वैध विमा नसल्यास अपघातानंतर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळवणे कठीण होते. अनेक वेळा वाहनमालक किंवा चालक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यात विलंब होतो.




