मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी शिक्षक आणि समाजाची वज्रमूठ अनिवार्य

मयुर चौधरी यांचे प्रतिपादन

अमरावती /24 फेब्रुवारी : मराठी भाषा आणि मराठी माध्यमाच्या शाळा सध्या एका कठीण कालखंडातून जात असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित येणे ही काळाची गरज आहे. मराठी शाळांनी राज्याला आजवर सुसंस्कृत आणि प्रगल्भ पिढी दिली आहे, मात्र आज त्याच शाळांना स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे ही चिंतेची बाब आहे. कस्तुरबा गांधी व ताराबेन मश्रूवाला यांच्या स्मृती महोत्सवानिमित्त ’मराठी शाळांचे पुनरुज्जीवन: शासन, शिक्षक, पालक आणि समाजाची भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादात मयुर चौधरी यांनी हे परखड विचार मांडले. केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता, जेव्हा शिक्षक, पालक आणि समाज एका ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र येतात, तेव्हाच मराठी शाळा जागतिक दर्जाची भरारी घेऊ शकतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कस्तुरबा सर्वोदय मंडळ, माधन येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी एकनाथराव बावनकर होते, तर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप चौधरी व राकेश राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. मयुर चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात वाबळेवाडी आणि जालिंदरनगर येथील शाळांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले. वारे गुरुजींच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून या शाळांनी जसा कायापालट केला, तसाच प्रयोग प्रत्येक मराठी शाळेत होणे आवश्यक आहे. दुसरे वक्ते राकेश राजपूत यांनी नमूद केले की, शिक्षकांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवल्यास त्याचे थेट प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत उमटते आणि त्यातूनच पालकांचा विश्वास दृढ होतो. अध्यक्षीय भाषणात बावनकर यांनी शाळांच्या प्रगतीसाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुळे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button