ई-प्रशासन क्षेत्रात अमरावतीची महानगरपालिका राज्यात अव्वल
मोठ्या शहरांना मागे टाकत अमरावतीची गरुडभरारी

राज्यात चौथा क्रमांक मिळवून प्रस्थापितांना दिला धोबीपछाड
अमरावती /19 फेब्रुवारी : भारत सरकार आणि राज्य शासनाच्या ई-प्रशासन धोरणांच्या अंमलबजावणीत अमरावती महानगरपालिकेने राज्याच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानकांनुसार प्रसिद्ध झालेल्या ताज्या अहवालात अमरावती महानगरपालिकेने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या शर्यतीत तब्बल चौथा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे 300 कोटी रुपयांहून अधिक अर्थसंकल्प असलेल्या मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपूर सारख्या बलाढ्य महापालिकांना अमरावतीने प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर पिछाडीवर टाकले आहे. नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांच्यानंतर अमरावतीचे नाव आता डिजिटल प्रशासनात अग्रक्रमाने घेतले जात आहे.
’पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन’ (पीआरओ) या संस्थेने महानगरपालिकांच्या ई-प्रशासकीय स्थितीचा सखोल अभ्यास करून हा निर्देशांक निश्चित केला आहे. यामध्ये नागरिकांना मिळणार्या ऑनलाईन सेवा, कारभारातील पारदर्शकता, माहितीची सुलभ उपलब्धता, ई-प्रशासन भ्रमणध्वनी उपयोजनेचा (अॅप) प्रभावी वापर, सामाजिक माध्यमांचा वापर आणि अधिकृत संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती यांसारख्या अत्यंत कडक निकषांवर हे मूल्यांकन करण्यात आले. या यशाबद्दल महानगरपालिकेच्या पहिल्या आमसभेत आनंद व्यक्त करण्यात आला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, युवा स्वाभिमान पक्षाचे गटनेते नानाभाऊ आमले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अविनाश मार्डीकर, गटनेते राजेंद्र तायडे, एआयएमआयएमचे गटनेते हमीद भाई आणि प्रशांत वानखडे यांनी आयुक्त सौम्या शर्मा चांडक, संगणक प्रणाली व्यवस्थापक अमित डेंगरे व त्यांच्या संपूर्ण चमुचे विशेष कौतुक केले. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या यशाचे स्वागत करत प्रशासनाला शाबासकी दिली. नागरिकांना सर्व आवश्यक सेवा भविष्यातही अशाच पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने मिळाव्यात यासाठी महापालिका कटिबद्ध राहील, असा विश्वास आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रगतीची अधिक माहिती नागरिकांना www. policyresearch.in किंवा महापालिकेच्या www.amravaticorporation.in या संकेत स्थळावर पाहता येईल.
मनपाची गरुडभरारी: तंत्रज्ञानाचा विजय
अमरावती महानगरपालिकेने मर्यादित संसाधने असूनही केवळ नियोजनाच्या जोरावर मुंबई, नागपूर सारख्या श्रीमंत महापालिकांना डिजिटल स्पर्धेत हरवले आहे. पारदर्शक कारभार, भ्रमणध्वनी उपयोजनेचा कल्पक वापर आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या जिद्दीमुळेच अमरावतीला राज्यात चौथा मानाचा क्रमांक मिळाला असून हे यश विदर्भासाठी अभिमानास्पद ठरले आहे.




