भयंकर! हत्या करुन जाळलेला मृतदेह कालव्यात टाकला
पथ्रोटच्या वागडोह-जहानपूर परिसरातील घटना, ग्रामस्थ हादरले

कोळसा झालेले प्रेत कुणाचे? मृतदेहाला कारमधून आणल्याचा संशय
पथ्रोट/ 11 फेब्रुवारी – हत्या करुन मृतदेहावर डिझेल टाकले व कोळसा झालेला देह कालव्यात टाकुन दिला. या भयंकर घटनेने जिल्हा हादरला आहे.
पथ्रोट जवळील वागडोह-जहानपूर परिसरातील हनुमान मंदिरासमोरील निर्जन कालव्यामध्ये मृतदेह आढळल्यानंतर एकच हाहाकार माजला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. कालव्यालगत असलेल्या शेतात गबने नावाचे गृहस्थ रखवाली (ओलित) करत असताना त्यांना कालव्याच्या दिशेने धूर आणि काहीतरी जळत असल्याचा उग्र वास आला. त्यांनी आश्चर्यापोटी कालव्यात डोकावून पाहिले असता, समोरचे दृश्य पाहून त्यांना दरदरूण घाम फुटला. एका व्यक्तीचा देह आगीच्या ज्वाळांमध्ये वेढलेला होता. गबने यांनी क्षणाचाही विलंब न लावता खोडगावच्या सरपंचांना याबद्दल माहिती दिली. सरपंचांनी तात्काळ पथ्रोट पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची गंभीरता कळवली. काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि ही बातमी वार्यासारखी पसरताच वागडोहचे पोलीस पाटील यांच्यासह हजारो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकर्यांनी एका चारचाकी वाहनाचा वापर करून मृतदेह या ठिकाणी आणला असावा. घटनास्थळावर गाड्यांच्या टायरचे जे ठसे उमटले आहेत, ते खोडगावच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. मारेकर्यांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या डिझेलचा वापर करून मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी त्याला पूर्णपणे जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तातडीने अमरावती येथून न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक) पथक पाचारण करण्यात आले. या पथकाने राखेमधून आणि आजूबाजूच्या परिसरातून महत्त्वाचे वैज्ञानिक पुरावे गोळा केले आहेत. मनीष ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हा मृतदेह मनुष्याचा असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. सध्या पथ्रोट पोलीस, ठाणेदार आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक विविध कोनातून या प्रकरणाचा तपास करत असून, मारेकरी नक्कीच कायद्याच्या कचाट्यात सापडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टायरच्या खुणा ठरणार मुख्य धागा-मारेकर्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी कोणत्या मार्गाने आली आणि कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता खोडगाव मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि संशयास्पद हालचालींची तपासणी करत आहेत. घटनास्थळावरील टायरचे ठसे हा या तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जात आहे.




