दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही
दादांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करेन

पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट
मुंबई/10 फेब्रुवारी –अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. कामकाजाची सर्व सुत्रे हातामध्ये घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी फेसबुकवर भावुक पोस्ट शेअर केली. ’दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न मी करेन.’, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, ’आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे.




