कर्मचार्‍यांनी विद्यापीठासाठी कुटुंब समजून कार्य केले

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन

विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार

अमरावती /2 फेब्रुवारी : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा आज जो डोलारा उभा आहे, तो केवळ इथल्या निष्ठवान कर्मचार्‍यांच्या अखंड कष्टामुळे आणि त्यागामुळेच बहरला आहे. आपली 30 ते 40 वर्षांची हयात विद्यापीठाच्या सेवेसाठी खर्च करणार्‍या या कर्मचार्‍यांनी विद्यापीठाला केवळ नोकरीचे ठिकाण न मानता एक ‘कुटुंब’ समजून काम केले, असे भावपूर्ण प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठातून सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कर्मचार्‍यांच्या निवृत्तीमुळे केवळ एक व्यक्ती जात नाही, तर त्यासोबत दांडगा अनुभवही निवृत्त होत असल्याची खंत व्यक्त करत कुलगुरूंनी सत्कारमूर्तींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात श्री. सुरेंद्र गुल्हाने, श्री. नरेंद्र खैरे आणि श्री. संजय काळे या तीन कर्मचार्‍यांचा त्यांच्या पत्नीसह अत्यंत सन्मानाने सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा संचालक डॉ. नितीन कोळी, उपकुलसचिव श्री. मंगेश वरखेडे, कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री. अजय देशमुख आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. हेमंत देशमुख यांनी आपल्या भाषणात कर्मचार्‍यांच्या शिस्तीचे आणि वेळेच्या नियोजनाचे कौतुक करताना सांगितले की, या कर्मचार्‍यांच्या जिद्दीमुळेच विद्यापीठाचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचला आहे. सत्कारमूर्ती सुरेंद्र गुल्हाने, नरेंद्र खैरे आणि संजय काळे यांनी आपल्या मनोगतातून सहकार्‍यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते कर्मचार्‍यांना त्यांच्या हक्काच्या ठेवीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने झाली. यावेळी वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, माजी अध्यक्ष भैय्यासाहेब भारंबे, विलास सातपुते, अशोक धाबे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी आणि सत्कारमूर्तींचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. विलास नांदुरकर यांनी आणि आभार प्रदर्शन डॉ. धनंजय पाटील यांनी मानले. सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांनी केवळ कागदपत्रांची जुळवाजुळव केली नाही, तर माणुसकीची नाती जपली. आज या कर्मचार्‍यांची मुले मोठ्या पदांवर कार्यरत असणे, ही त्यांच्या कष्टाची खरी पावती आहे. अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन समाधानाने निवृत्त होणे, हे कोणत्याही कर्मचार्‍यासाठी भाग्याचे लक्षण असून विद्यापीठासाठी हा क्षण अत्यंत भावनिक असल्याचे कुलगुरूंनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Back to top button