दोन कारच्या धडकेत चौघांचा मृत्यू

भातकुली-दर्यापूर मार्गावरील सायत फाट्याजवळ भीषण अपघात

* एक गंभीर खासगी रुग्णालयात दाखल
* घटनेत अमरावतीच्या दोन व्यापार्‍याचा समावेश
* जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी

अमरावती /28 जानेवारी : जिल्ह्यातील दर्यापूर ते भातकुली मार्गावर बुधवारी रात्री काळाने अत्यंत भीषण झडप घातली असून सायत गावाच्या शिवारात दोन कारची समोरासमोर धडक होऊन चार जणांचा जागीच करुण अंत झाला. रात्री दहा वाजताच्या सुमारास मानकर ढाब्यासमोर ’आय टेन’ आणि ’होंडा सिटी’ या दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या या अंगावर काटा आणणार्‍या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि इंजिनचा भाग थेट प्रवाशांच्या अंगावर आला. या काळजाचा थरकाप उडवणार्‍या घटनेत अमरावतीतील नामांकित ऑटोमोबाईल व्यापारी मुकुंद एकनाथराव काळे (वय 57 वर्षे, रा. चैतन्य कॉलनी, यशोदा नगर) यांच्यासह चालक जुनेद खान (रा. जुनी वस्ती, बडनेरा) आणि अमरावती शहरातील सुप्रसिद्ध मिठाई व्यावसायिक गोपाल राजपुरोहित (वय 28 वर्षे) व प्रेम उर्फ प्रकाश किशनराम बिश्नोई (वय 32 वर्षे, रा. जोधपूर, राजस्थान) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताचा आवाज एवढा प्रचंड होता की सायत परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली मात्र गाड्यांची अवस्था पाहून उपस्थितांच्या पायाखालची जमीन सरकली. या भीषण अपघातामध्ये शरद अळसपूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अमरावती येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची बातमी वार्‍यासारखी पसरताच मृतांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांनी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मध्यरात्री रुग्णालयाचा परिसर लोकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता आणि आपल्या माणसांना गमावल्यामुळे नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मुकुंद काळे हे गाडीच्या सुट्या भागांचे मोठे व्यापारी होते, तर राजपुरोहित आणि बिश्नोई हे मिठाई व्यवसायातील प्रसिद्ध चेहरे असल्याने संपूर्ण व्यापारी वर्गातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 27 बीई 0103 क्रमांकाचे वाहन आणि दुसर्‍या कारची ही टक्कर रात्री 10:05 वाजताच्या सुमारास सायत फाट्यावर झाली. या घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजू राजुलवार व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून रस्ता मोकळा केला आहे. हे सर्वजण नेमक्या कोणत्या कारणाने प्रवास करत होते याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. एकाच वेळी चार कर्तबगार व्यक्तींचा मृत्यू झाल्याने सायत परिसरासह संपूर्ण अमरावती शहरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.
मृत्यूचा सापळा बनलेला सायत फाटा-अमरावती-दर्यापूर मार्गावरील सायत फाटा आणि मानकर ढाब्याचा परिसर रात्रीच्या वेळी अतिवेगामुळे अत्यंत धोकादायक ठरत आहे. बुधवारी झालेल्या या भीषण अपघातात चार हसत्याखेळत्या कुटुंबांचा आधार हिरावला गेला असून इंजिनच्या भागात अडकलेले मृतदेह बाहेर काढताना प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यातही पाणी आले होते. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि दोन कारचा केवळ लोखंडी ढिगारा शिल्लक राहिला.

संबंधित बातम्या

Back to top button