महाभूलेख पोर्टल आता पुन्हा पूर्ण क्षमतेने
सातबारा मिळणे शेतकर्यांसाठी झाले सोपे

* पीक कर्ज वाटपाचा मार्ग आता सुकर
अमरावती/23 एप्रिल- महसूल विभागाचे महाभूलेख पोर्टल तांत्रिक कारणांमुळे 30 मार्चपासून बंद होते. त्यामुळे शेतकर्यांची मोठी गैरसोय झाली असून, आता 7 एप्रिलपासून पोर्टल पूर्ववत झाल्याने सातबारा आणि फेरफार मिळणे सोपे झाले आहे. खरीप हंगामातील पीक कर्जाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोर्टलच्या तांत्रिक नूतनीकरणामुळे महसूल विभागाची वेबसाईट पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा मोठा फटका ऐन खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत असलेल्या शेतकर्यांना बसला.
सर्व्हर डाऊन असल्याने सातबारा, आठ-अ आणि फेरफार उतारा मिळवणे मुश्कील झाले होते. यामुळे पीक कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने शेतकर्यांची मोठी ओढाताण झाली. अनेक शेतकर्यांच्या बँकांमधील कर्जाच्या फाईल्स प्रलंबित होत्या. मात्र, आता पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. आता शेतकरी घरबसल्या किंवा केंद्रावर जाऊन बिनदिक्कतपणे आपले उतारे मिळवू शकत आहेत. नवीन प्रणाली अधिक सुरक्षित आणि वेगवान बनवण्यात आली असून, यामुळे एकाच वेळी लाखो नागरिक लॉग-इन करू शकणार आहेत. या सुधारणेमुळे प्रशासकीय कामांनाही वेग आला असून, शेतकर्यांसाठी आता कर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ झाली आहे.




