सीताबाई संगई शाळेत मध्यान्ह भोजनातून विषबाधा, 12 विद्यार्थी आजारी
निकृष्ट व किडा-युक्त खिचडीमुळे पालकांत तीव्र संताप

* ठेकेदार व अधिकार्यांवर गंभीर आरोप
अंजनगाव सुर्जी /28 जानेवारी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या मध्याह्न भोजनातून अत्यंत गंभीर प्रकार समोर आला असून,अंजनगाव सुर्जी येथील नामांकित सीताबाई संगई विद्यालयात किडा-युक्त व निकृष्ट दर्जाची खिचडी खाल्ल्याने तब्बल 12 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
गरीब व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधील कुपोषण रोखणे, शाळांमधील उपस्थिती वाढवणे व सामाजिक समानता प्रस्थापित करणे हा शालेय पोषण आहार योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र अंजनगाव सुर्जीतील या घटनेमुळे या योजनेच्या अंमलबजावणीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवार, दि. 22 जानेवारी रोजी शाळेत विद्यार्थ्यांना दिलेल्या खिचडीमध्ये किडे आढळून आल्याने अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळेत धाव घेतली.
या प्रकरणी एका पालकाने मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित ठेकेदार व पोषण आहार विभागातील जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची तसेच खिचडी पुरवठ्याचा ठेका तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पंचायत समिती कार्यालयातील पोषण आहार अधीक्षक शीला आठवले या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे आरोप पालकांकडून करण्यात येत आहेत. याबाबत मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की, खिचडी पुरवठ्याची जबाबदारी ही ठेकेदार व पोषण आहार विभागाची असून शाळा प्रशासनाची थेट जबाबदारी नाही.शहरातील काही शाळांना खिचडी शिजवून पुरवठा करण्याचा ठेका ‘नुरैल’ नावाच्या बचत गटाला देण्यात आला असून, ही खिचडी सुर्जी परिसरातील रसोईघरातून पुरवली जाते. ठेकेदार अमरावती येथे वास्तव्यास असल्याने संपूर्ण काम मजुरांच्या भरवशावर सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. विषबाधेची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित रसोईघराची घाईघाईने साफसफाई करण्यात आल्याचे तसेच रसोईघरावरील फलक व पोषण आहार योजनेचा परवाना गायब केल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. तर सीताबाई संगई विद्यालयाचे मुख्याध्यापक राकेश दोनगांवकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, खिचडी पुरवठ्याचा ठेका प्रशासनाने दिला असून तो पोषण आहार अधीक्षक यांच्या देखरेखीखाली आहे. या घटनेला ठेकेदार व संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला नाही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पालकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणात प्रशासनातील काही मुख्य घटकांची मिलीभगत असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे अंजनगाव सुर्जीतील शालेय पोषण आहार व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास पालक व नागरिकांकडून आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




