संजय हिंगासपुरे, विनोद गुहे अडीच वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक
युवा स्वाभिमान पक्षाची घोषणा

आ.राणांच्या उपस्थितीत कोअर कमिटीचा निर्णय
अमरावती /19 फेब्रुवारी : शंकर नगर येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या नव्या कार्यालयात पार पडलेल्या कोअर कमिटीच्या धडाकेबाज बैठकीत महानगरपालिकेतील रिक्त पदांसाठी अखेर नावांची घोषणा करण्यात आली आहे. आमदार रवि राणा आणि मार्गदर्शक सुनील राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थायी समिती सदस्यपदासाठी प्रशांत वानखडे, दीपक साहू आणि प्रियंका पाटणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी संजय हिंगासपुरे आणि विनोद गुहे यांना प्रत्येकी अडीच वर्षांची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. शहराच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणार्या युवा स्वाभिमान पार्टीने आगामी महापालिका कामांचा वेग वाढवण्यासाठी आपल्या शिलेदारांची निवड जाहीर केली आहे. शंकर नगर येथील नूतन कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले आणि बैठकीला सुरुवात झाली. या ऐतिहासिक बैठकीत पक्षाच्या कोअर कमिटीने अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा करून अनुभवी चेहर्यांना संधी देण्याचे निश्चित केले. या निर्णयानुसार, मनपाच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्या स्थायी समितीसाठी प्रशांत आनंदराव वानखडे, दीपक किसनलाल साहू आणि प्रियंका भूषण पाटणे यांच्या नावाचा ठराव पारित झाला. त्यांच्या कामाचा अनुभव आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुरू असलेला सस्पेन्स संपवत पक्षाने ’सत्ता वाटपाचा’ नवा फॉर्म्युला अमलात आणला आहे. यात संजय शंकरराव हिंगासपुरे यांना पहिले अडीच वर्षे आणि त्यानंतरचे अडीच वर्षे विनोद पुंडलिकराव गुहे यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, सुनील राणा, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, प्रा. डॉ. अजय गाडे, विनोद जायलवाल, शैलेंद्र कस्तुरे, जिल्हा महिला अध्यक्षा सोनाली नवले आणि कमल किशोर मालानी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बैठकीत नगरसेवक प्रा. प्रशांत वानखडे, सुमती ढोके, अजय जयस्वाल, किशोर जाधव, दीपक साहू, नंदा सावदे, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, ड. प्रिती रेवणे, महेश मुलचंदानी, योगेश विजयकर, अर्चना पांडे, प्रियंका पाटणे यांच्यासह उमेश ढोणे, संजय मुनोत, सत्येंद्रसिंग लोटे, बबन रडके, बाळूभाऊ इंगोले, गणेशदास गायकवाड, निलेश कुलकर्णी, सुखदेव तरडेजा, दादाराव महल्ले, प्रमोद येवतीकर, नितीन बोरेकर, रामकृष्ण पळसकर, विनोद गुहे, भूषण पाटणे, अशोक पांडे, शैलेंद्र मेघवानी, मिलिंद कहाळे, श्रीकांत बिजवे, मनोज डाहाके, रमेश गुप्ता, पुरुषोत्तम बजाज, श्याम कथे, किरण अंबाडकर, अविनाश काळे, डॉ. संतोष बनसोड, साक्षी उमक आणि सुनील हरणे या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या निवडीमुळे पक्षात नवचैतन्य पसरले असून शहराच्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
पक्षाची नवी रणनीती आणि एकता
युवा स्वाभिमान पार्टीने आपल्या नव्या वास्तूतून शहराच्या विकासाचा नवा संकल्प सोडला आहे. स्थायी समिती आणि स्वीकृत पदांच्या नियुक्त्या करताना सर्व नगरसेवक आणि कोअर कमिटीला विश्वासात घेऊन एकमताने निर्णय घेण्यात आला, जो पक्षाची अभेद्य एकता दर्शवतो.




