रानडुकराच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

गायवाडी शिवारात कापूस वेचणी दरम्यान घटना

दर्यापूर /27 जानेवारी : तालुक्यातील गायवाडी शेत शिवारात रानटी डुकराच्या भीषण हल्ल्यात एका शेतमजूर महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
हरदेवी भीमराव रायबोले (वय 40, राहणार गायवाडी) असे या मृत महिलेचे नाव असून, मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जामणीक यांच्या शेतात हरदेवी या इतर महिलांसोबत कापूस वेचणीचे काम करत होत्या. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक झुडपात लपून बसलेल्या एका हिंसक रानडुकराने त्यांच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका भयानक होता की हरदेवी यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. त्यांच्या रक्ताळलेल्या अवस्थेतील किंकाळ्या ऐकून इतर मजूर आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या हरदेवी यांना उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण दर्यापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम जोरात सुरू असतानाच अशा प्रकारे वन्य प्राण्यांनी थेट मानवी वस्तीजवळ हल्ले सुरू केल्याने शेतमजुरांच्या मनात मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोट भरण्यासाठी शेतात जावे लागते, मात्र आता जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ मजुरांवर आली आहे. वन विभागाने या हिंसक प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वन विभागाच्या उदासीनतेचा फटका-जंगल परिसरात रानडुकरांचा सुळसुळाट झाला असून पिकांच्या नुकसानीसोबतच आता मानवी जीवही धोक्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही वन विभाग सुस्त असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ही घटना प्रशासनाचे डोळे उघडणारी असून, हिंसक वन्य प्राण्यांना जेरबंद करून शेतकरी व मजुरांना संरक्षण देणे आता काळाची गरज बनली आहे .

संबंधित बातम्या

Back to top button