बहिरमच्या रणांगणात प्रहारचा जंगी शंकरपट
अडीचशेहून अधिक बैलजोड्यांची हजेरी

* बैलजोड्यांच्या चित्तथरारक शर्यतीने यात्रेची रंगत वाढली
* सातपुड्याच्या पायथ्याशी घुमला सर्जा राजाचा आवाज
परतवाडा /22 जानेवारी : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या बहिरम बाबांच्या प्रसिद्ध यात्रेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित भव्य शंकरपट स्पर्धेचा रणसंग्राम मोठ्या उत्साहात सुरू झाला असून, अडीचशेहून अधिक बैलजोड्यांच्या सहभागाने यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात नवा उत्साह संचारला आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या वेगवान बैलजोड्या आणि शौकिनांच्या अलोट गर्दीमुळे संपूर्ण परिसर ’बैलगाडा’ संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांच्या हस्ते या थराराचे उद्घाटन झाले असून, अंकुश जवंजाळ या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक काळ चालणार्या या यात्रेत यंदा शंकरपट आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. पहिल्याच दिवशी पात्रता फेरीत बैलजोड्यांनी धावपट्टीवर आपल्या वेगाची चुनूक दाखवली. यामध्ये गावगाडा धानोरा येथील मोरया आणि वाघ्या या जोडीने सहा पूर्णांक 67 सेकंदात अंतर कापत उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या. ’क’ गटातून हिंगोलीच्या किस्मत आणि एक्का या जोडीने सहा पूर्णांक 60 सेकंदात आपले कसब सिद्ध केले, तर मेहकरच्या रॉकी आणि भीमा या जोडीने सहा पूर्णांक 16 सेकंदांची सर्वोत्तम वेळ नोंदवत मैदानावर आपला दबदबा निर्माण केला. हिंगोलीचे राजाभाऊ मंगळे आणि अकोल्याचे विकास दाभाडे हे पंच म्हणून चोख भूमिका बजावत असून, प्रत्येक फेरीनंतर प्रेक्षकांचा जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटाने आसमंत दुमदुमून जात आहे. बैलजोड्यांची सजावट आणि गाडीवानांचे कौशल्य पाहण्यासारखे असून, आता सर्वांचे लक्ष आगामी अंतिम फेरीत कोणता मानाचा किताब कोणाकडे जातो याकडे लागले आहे.
वेगाचा थरार आणि मानाचा किताब-बहिरमच्या या जंगी शंकरपटात अकोला, हिंगोली आणि मेहकरच्या बैलजोड्यांनी आपल्या अफाट वेगाने मैदानाचा ताबा घेतला आहे. सहा सेकंदांच्या आसपास धावणार्या या बैलांच्या जोडीने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला. उद्या होणार्या अंतिम सामन्यात विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष वेधले गेले आहे.




